इगतपुरीत साकारणार भव्य चित्रनगरी

मुंबईतील गोरेगाव चित्रनगरीच्या धर्तीवर नाशिकजवळच्या इगतपुरी येथे भव्य चित्रनगरी साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नाशिक चित्रनगरीसाठी सांस्कृतिक कार्य विभागाला जमीन हस्तांतरित करून देण्याचे निर्देश देण्यात आले. चित्रनगरीसाठी आर्थिक सुसाध्यता अहवाल आणि विश्लेषण करण्यासाठी केपीएमजी या तज्ञ सल्लागार कंपनीची नेमणूक करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नाशिक विभाग विकास कार्यक्रम 2009 अंतर्गत नाशिक येथे चित्रपटसृष्टी निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिली आहे. नियोजन विभागाने सन 2009 ते 2012 या कालावधीसाठी नाशिक चित्रपटसृष्टीसाठी 10 कोटी रुपये निधी मंजूर केला होता. या प्रकल्पासाठी मौजे मुंढेगाव (ता. इगतपुरी) येथे प्रत्यक्ष पाहणी करून 39 हेक्टर शासकीय जमीन सांस्कृतिक कार्य विभागाला देण्यासाठी जमीन जिल्हाधिकारी नाशिक यांनी महसूल विभागाला प्रस्ताव पाठवला आहे.

नाशिक येथे चित्रनगरी व्हावी असा आमच्या विभागाचा मानस आहे. या चित्रनगरीसाठी प्रकल्प व्यवस्थापक सल्लागाराची नेमणूक करण्याचे निर्देशदेखील देण्यात आल्याचे सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री आशीष शेलार यांनी बैठकीत सांगितले.

व्यवहार्यता अहवाल सादर

नाशिक चित्रनगरीचा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आणि सुसाध्य आहे किंवा कसे याची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे काम दादासाहेब फाळके चित्रनगरी महामंडळामार्फत मिटकॉन या संस्थेला देण्यात आले होते. मिटकॉन या संस्थेने व्यवहार्यता अहवाल तयार करून तो महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाला सादर केला आहे.