
शिर्डीत भक्तांचीवाढती गर्दी आणि त्यासोबतच वाढती गुन्हेगारी हा चर्चेचा विषय आहे. मात्र शिर्डीत दररोज येणारे लाखो भक्त हा केंद्रबिंदू मानून त्यांची सुरक्षेचा महत्त्वाचा मुद्दा आहे. भयमुक्त व दहशतमुक्त वातावरणामध्ये प्रत्येक साईभक्ताने दर्शन घ्यावे, ही साई संस्थानची महत्वाची जबाबदारी आहे. मात्र, मंदिरातील सुरक्षा ही साई संस्थानकडे आहे, तर मंदिर आणि परिसरातील जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे. मात्र, त्यांचा समन्वय नसल्याने अनेकवेळा गोंधळ होतो. तसेच मंदिराला दहशतवादी हल्ल्याची भीती असल्याने शिर्डी साई संस्थानचे तत्कालीन विश्वस्त डॉ. राजेंद्र राजा बाली यांनी 19 ऑक्टोबर 2019 रोजी गृहमंत्रालयाला पत्र लिहून श्री साईबाबा संस्थान विश्वस्थ मंडळाच्या बैठकीमध्ये शिर्डीच्या साईबाबा मंदिराच्या संरक्षणासाठी सीआरएफ आणि सीआरपीएफ सुरक्षा व्यवस्था पुरविण्याबाबत एकमत झाले असून ती पुरवण्यात यावी, अशी मागणी केली होती. या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्याला नवीन वर्षात यश येणार आहे.
गृहमंत्रालयाकडून मंदिर परिसरात सीआयएसएफ आणि सीआरपीएफ सुरक्षा देण्याचे संकेत मिळाले आहेत. साईबाबा मंदिराला चांगल्या दर्जाची सुरक्षा देण्यासाठी आणि भाविकांना भयमुक्त दर्शन व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला असून त्याला यश मिळणार आहे. नगरमधील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पुढाकाराने मंदिर पोलीस सुरक्षा अधिकारी यांनी गृहमंत्रलयात अहवाल पाठविला असून याच्यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फसवणूक, लूटमार, पाकिटमारी, थेट दर्शन वेवस्था, अनेकांची मंदिर परिसरात होणारी लुडबूड, पासचा काळाबाजार याला पायबंद बसणार आहे.



























































