सिस्कोचा 6 हजार कर्मचाऱ्यांना डच्चू

नेटवर्किंग कंपनी सिस्कोने मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्याचे ठरवले आहे. कंपनीने चौथ्या तिमाहीची (मे ते जुलै) आकडेवारी जाहीर केली. ही आकडेवारी अपेक्षेपेक्षा चांगली होती. परंतु तरीही कंपनी कर्मचारी कपात करणार आहे. सिस्को आपल्या कंपनीतील सात टक्के कर्मचारी कपात करणार आहे, अशी माहिती कंपनीने अमेरिकेच्या एक्स्चेंजला दिली. या कर्मचारी कपातीअंतर्गत सहा हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाणार आहे. कंपनीची ही या वर्षातील दुसरी मोठी कर्मचारी कपात आहे. याआधी फेब्रुवारी 2024 मध्ये कंपनीने चार हजार कर्मचाऱयांना कामांवरून काढून टाकले होते. त्या वेळी कंपनीने चार टक्के कर्मचारी कपात केली होती. कंपनीला खर्च कमी करायचा आहे. तसेच सायबर सुरक्षा आणि एआयवर फोकस करायचा आहे, असे कंपनीने एक्स्चेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे. सहा हजार कर्मचाऱयांच्या कपातीनंतर कंपनीला एक बिलियन डॉलरची मदत मिळू शकते. कंपनी या पैशांत एआय आणि सायबर सिक्युरिटीवर खर्च करेल. 2025 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीला 700 ते 800 मिलियन डॉलर वाचवण्यात यश येईल, असे कंपनीला वाटते.