माझ्या भावाला फोन करण्याची हिंमत कशी झाली? सरन्यायधीश संतापले, नेमकं काय घडलं?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वैद्यकीय प्रवेशाशी संबंधित सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशासंदर्भात भावाला फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या याचिकाकर्त्यावर सरन्यायाधीश सुर्य कांत चांगलेच संतापले. माझ्या भावाला फोन करण्याची हिम्मत कशी झाली? माझ्याशी अशा प्रकारे वागण्याची हिंमत पुन्हा करू नका, अशा कडक शब्दांत सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्याला खडेबोल सुनावले.

मूळचे सामान्य प्रवर्गातील असलेल्या हरियाणातील दोन उमेदवारांनी उत्तर प्रदेशातील सुभारती मेडिकल कॉलेजमध्ये पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळावा म्हणून याचिका दाखल केली होती. दोघांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याचा दावा करत अल्पसंख्याक कोट्यातून प्रवेश मागितला होता. मात्र जानेवारी महिन्यात न्यायालयाने त्यांच्या या धर्मांतराच्या सत्यतेवर शंका उपस्थित करत चौकशीचे आदेश दिले होते.

या याचिकेवर बुधवारी पुन्हा सुनावणी झाली. यावेळी तुमच्या अशिलानी काय केले आहे याची तुम्हाला कल्पना आहे का? त्यांच्या वडिलांविरुद्ध न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल कारवाई का करू नये? असा सवाल सरन्यायाधीश सुर्य कांत यांनी याचिकाकर्त्याच्या वकिलाला केला.

याचिकाकर्त्याच्या वडिलांनी सरन्यायाधीशांच्या भावाला फोन करून त्यांनी असा आदेश कसा दिला, अशी विचारणा केली. ते मला हुकूम देणार का? असे विचारत मला धमकी देण्याचा प्रयत्न करू नका. मी गेल्या 23 वर्षांपासून अशा प्रवृत्तींना हाताळत आहे. एखादी व्यक्ती देशाबाहेर लपली तरी तिला कशी शिक्षा द्यायची हे मला ठाऊक आहे, असा संताप सरन्यायाधीशांनी व्यक्त केला.

घडल्या प्रकाराबाबत अनभिज्ञता व्यक्त करत याचिकाकर्त्याच्या वकिलाने न्यायालयाची माफी मागितली. न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी लांबणीवर टाकली आहे. थेट सरन्यायाधीशांच्या कुटुंबाशी संपर्क साधून दबाब टाकण्याचा प्रयत्न केल्याने हे प्रकरण आता न्यायालयीन वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे.