जोकोविच हरता हरता नशिबाने जिंकला, आता उपांत्य फेरीत सिनरशी रंगणार द्वंद्व

जगातील दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आणि सलग दोन वेळचा विजेता यानिक सिनरने आपला जबरदस्त फॉर्म कायम ठेवत ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. दुसरीकडे, विक्रमी दहा वेळचा विजेत्या नोव्हाक जोकोविचला नशिबाची साथ लाभली आणि तो हरता हरता भाग्याच्या जोरावर अंतिम चार खेळाडूंमध्ये पोहोचला आहे. आता उपांत्य फेरीत त्याची गाठ सिनरशी पडेल.

उपांत्यपूर्व फेरीत सिनरने अमेरिकेच्या आठव्या मानांकित बेन शेल्टनचा 6-3, 6-4, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. दोन तास 23 मिनिटे चाललेल्या या सामन्यात सुरुवातीपासून शेवटपर्यंत सिनरचेच वर्चस्व दिसून आले. आता सलग तिसऱयांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकावण्यासाठी सिनर केवळ दोन विजय दूर आहे.

दरम्यान, जोकोविचचा उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास मात्र नाटय़मय ठरला. इटलीच्या लॉरेंझो मुसेटीविरुद्धच्या सामन्यात जोकोविचने पहिले दोन सेट 4-6, 3-6 असे गमावले होते. सामना मुसेटीच्या बाजूने झुकत असतानाच तिसऱया सेटमध्ये त्याच्या उजव्या पायाला दुखापत झाली. वैद्यकीय विश्रांतीनंतरही वेदना न शमल्याने मुसेटीने अखेर सामना सोडण्याचा निर्णय घेतला आणि जोकोविचला सेमीफायनलचे तिकीट मिळाले. गेली दोन वर्षे 25 वे ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याचे ध्येय बाळगून मैदानात उतरत असलेल्या जोकोविचला यंदा नशिबाची साथ लाभल्यामुळे तो जेतेपदही उंचावेल, अशी अपेक्षा आहे.

सामन्यानंतर जोकोविच म्हणाला की, ‘मुसेटीसाठी मला खूप वाईट वाटते. तो आज माझ्यापेक्षा चांगला खेळत होता. प्रामाणिकपणे सांगायचं तर आज माझा दिवस नव्हता, पण टेनिसमध्ये कधी कधी नशिबाचाही मोठा वाटा असतो.’