हिंदुस्थानसोबत आमचे घनिष्ठ संबंध, आम्हाला अमेरिकेवर विश्वास नाही; इराणचे वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने आपली भूमिका स्पष्ट केली असून हिंदुस्थानसोबतच्या मैत्रीचा पुनरुच्चार केला आहे. “हिंदुस्थानसोबत आमचे अत्यंत घनिष्ठ आणि ऐतिहासिक संबंध आहेत, परंतु आम्हाला अमेरिकेवर अजिबात विश्वास नाही,” असे वक्तव्य इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे.

अमेरिकेसोबत चर्चा करण्यास नकार

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, सध्याच्या परिस्थितीत अमेरिकेसोबत कोणत्याही प्रकारची चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. “अमेरिका सातत्याने इराणवर निर्बंध लादत आहे आणि इस्रायलला उघडपणे पाठिंबा देत आहे. अशा विश्वासघातकी राष्ट्रासोबत वाटाघाटी करणे शक्य नाही,” असे बघाई यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे हिंदुस्थानचा उल्लेख करताना इराणने सकारात्मक सूर लावला आहे. हिंदुस्थानने नेहमीच संतुलित परराष्ट्र धोरण ठेवले असून दोन्ही देशांमधील व्यापारी आणि धोरणात्मक संबंध अधिक मजबूत होत असल्याचे इराणने नमूद केले. विशेषतः चाबहार बंदर आणि ऊर्जा क्षेत्रातील सहकार्यामुळे हिंदुस्थान हा इराणचा एक विश्वासार्ह भागीदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.