
सामना ऑनलाईन,मुंबई
पाणीपुरवठा करणारे सगळे तलाव पूर्ण भरलेले नसतानाच पावसाने घेतलेली एक्झिट मुंबईकरांना यंदा महाग पडू शकते. वर्षभर पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेल्या पाणीसाठय़ापेक्षा नऊ टक्के पाण्याची तूट यंदा राहिली आहे. त्यामुळे यंदा पाणीकपातीची टांगती तलवार मुंबईकरांवर आहे.
पावसाळय़ाच्या सुरुवातीला यंदा चांगला पाऊस पडला. पाच तलाव लागोपाठ जुलैमध्येच भरले. मात्र ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पावसाने विश्रांती घेतल्यामुळे तलावातील पाणीसाठा वाढला नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर, तानसा, विहार, तुलसी, अप्पर वैतरणा, भातसा, मध्य वैतरणा या सात तलावांत 1 ऑक्टोबर रोजी साडेचौदा लाख दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. तरच वर्षभर मुंबईकरांना पुरेसे पाणी मिळू शकते. मुंबईला दर दिवशी 3750 दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. मात्र सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सात तलावांत मिळून 13 लाख 23 हजार 541 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा नऊ टक्क्यांनी कमी आहे. सात तलावांमधील पाणीसाठा पुढील वर्षी जुलैअखेरपर्यंत पुरेल अशा पद्धतीने नियोजन करावे लागते. त्यामुळे यंदा पाणीकपातीचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागू शकतो. पुढील आठवडय़ात याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
- मुंबईची दररोजची पाण्याची गरज -3750 दशलक्ष लिटर
- सातही तलाव पूर्ण भरलेले असतानाचा पाणीसाठा – 14 लाख 47 हजार दशलक्ष लिटर
- सध्याचा पाणीसाठा – 13 लाख 23 हजार 541 दशलक्ष लिटर
- तूट – 9 टक्के



























































