महाराष्ट्रात ‘महायुतीचंच’ सरकार येणार – देवेंद्र फडणवीस

3685

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला चांगल्या जागा मिळाल्या असून राज्यात महायुतीचंच सरकार येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जोर देत म्हणाले. महायुतीचाच मुख्यमंत्री येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले. शिवसेनेचे आणि आमचे ठरले आहे, त्याप्रमाणे आम्ही पुढे जाणार आहोत, आमचे ठरल्याप्रमाणेच सर्व होईल असेही त्यांनी स्पष्ट केले. ही वेळ विजय साजरा करण्याची आहे. विश्लेषण करण्याची ही वेळ नाही. आमच्या काही जागा कमी झाल्या आहेत. त्यावर नंतर चर्चा करण्यात येईल. आता शिवसेनेशी चर्चा करून पुढील धोरण ठरवण्यात येणार आहे. दोन्ही पक्षात आता ठरल्याप्रमाणेच पुढील निर्णय घेण्यात येतील, असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जे.पी नड्डा आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाला चांगला विजय मिळाला आहे. ही वेळ विजय साजरा करण्याची वेळ आहे. विश्लेषण करण्याची ही वेळ नाही. यंदाच्या निवडणुकीत भाजपची टक्केवारी आणि स्ट्राइक रेट वाढला आहे. या विजयासाठी शिवसेना आणि महायुतीच्या घटकपक्षांचे मी आभार मानतो,असे मुख्यमंत्री म्हणाले.

या आधीच्या निवडणुकीपेक्षा आमच्या जागा कमी झाल्या आहेत. मात्र, यंदा आम्ही मागच्या वेळेपेक्षा कमी जागा लढवल्या होत्या. त्याचा विचार करता या निवडणुकीत आमचे मताधिक्य वाढले आहे. या निवडणुकीत जनतेने मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिल्याने आपण त्यांचे आभार मानतो. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल आमच्यासाठी धक्कादायक आहे. आमचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले पराभूत झाले आहेत. परळीतून पंकजा मुंडे यांचा पराभवही धक्कादायक आहे. आमचे काही महत्त्वाचे नेतेही पराभूत झाले आहेत. या निवडणुकीतील त्यांच्या पराभवाचे विश्लेषण करण्यात येईल. आमच्या जागा कमी झाल्या त्यात महायुतीला बंडखोरीचा मोठा फटका बसला आहे.  निवडून आलेल्यांपैकी 15 आमदार आपल्या संपर्कात असून ते महायुतीत येणार आहेत. ते महायुतीतल बंडखोर असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्यांना तिकीट मिळाले नसल्याने ते नाराज होते. आता विजयी झाल्यानंतर महायुतीत येण्याची त्यांची इच्छा आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. निवडणुकीत विरोधी पक्षांच्या काही जागा वाढल्या आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष प्रबळ झाल्याचे चित्र नाही. मात्र, सक्षम विरोधी पक्ष असण्याची लोकशाहीत गरज आहे. त्यामुळे ते योग्यप्रकारे काम करतील अशी अपेक्षा आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या