
सोलापूर आणि चंद्रपूरमध्ये खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यांनी कंबोडिया आणि तामीळनाडूत जाऊन किडन्या विकल्याची धक्कादायक माहिती विधानसभेत एका लेखी उत्तरातून आज पुढे आली आहे. 9 व्यक्तींच्या किडनी कंबोडिया व त्रिचीमध्ये विक्री केल्याचे तपासात उघड झाल्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तरात मान्य केले आहे.
चंद्रपूर येथील रोशन सदाशिव पुडे या दुधाचा व्यापार करणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्याने खासगी सावकाराकडून एक लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाचे व्याज वाढून ते 74 लाख रुपयांपर्यंत पोहोचले. सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याने कंबोडियामध्ये जाऊन किडनी विकली. हे किडनी रॅकेट तामीळनाडू येथील तिरुचिरापल्ली (तिरुची) येथील एका हॉस्पिटलद्वारे चालवले जात असल्याबद्दल नितीन राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
सोलापूरमधील एका व्यक्तीने आतापर्यंत सोळा जणांना किडनी तसेच मानवी अवयव विकण्यासाठी कोलकातामार्गे कंबोडिया येथील पनॉम मेन प्रेआ केट मेललिया या लष्करी रुग्णालयामध्ये विकली. या व्यक्तीने स्वतःची किडनीही 8 लाख रुपयांना विकली हे खरे आहे का, असा प्रश्न केला होता.
चंद्रपूर जिह्यात खासगी सावकाराच्या जाचामुळे किडनी विक्रीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूरमधील एका व्यक्तीच्या माध्यमातून कंबोडियामध्ये स्वतःची किडनी विकली आहे. याच तक्रारदार व्यक्तीने स्वतःसह अन्य नऊ व्यक्तींच्या किडनी कंबोडिया व तामीळनाडूतल्या त्रिचीमधील स्टारकिम्स हॉस्पिटलमध्ये विक्री केलेल्या आहेत असेही उत्तरात नमूद केले आहे.
अहिल्यानगरमध्ये खासगी सावकारीचा धंदा
अहिल्यानगर जिह्यात परवानाधारक खासगी सावकारांनी 2025मध्ये सुमारे 4 हजार 619 व्यक्तींना 19 कोटी 81 लाख 65 हजार रुपयांचे कर्जवाटप केले. खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे लेखी उत्तरात नमूद केले आहे.
दोन आरोपींना जामीन तर एक फरार
याप्रकरणी सावकरी करणाऱ्या सहा आरोपींसह किडनी खरेदी विक्रीत सहभागी असणाऱ्या अन्य पाच जणांना आरोपी करण्यात आले. सावकारी प्रकरणातील अटक करण्यात आलेले सहा आरोपी न्यायालयीन कोठडीत असून दोन आरोपींना जामीन मिळाला आहे. अटक न झालेल्या तीन आरोपींपैकी दोन आरोपींना अंतरिम जामीन मिळाला आहे तर एकजण फरार आहे.































































