मुख्यमंत्री गडचिरोलीला जाणार, पोलीस मुख्यालयात शहिदांना देणार मानवंदना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । गडचिरोली

गडचिरोली येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना गुरुवारी दुपारी गडचिरोली पोलीस मुख्यालयात मानवंदना दिला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीनर मुनगंटीवार, पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या उपस्थितीमध्ये शहिदांना मानवंदना दिली जाणार आहे.

गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांची नावं

महाराष्ट्र दिनाच्या दिवशी दुपारच्या सुमारास गडचिरोलीमध्ये नक्षलावाद्यांनी घडवून आणलेल्या भू-सुरुंग स्फोटात 15 जवान शहीद झाले. तसेच या हल्ल्यात वाहन चालकाचाही मृत्यू झाला. नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या गाडीला निशाणा करून स्फोट घडवून आणला. या हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्याबद्दल शोक व्यक्त केला. ‘गडचिरोली येथे झालेला हल्ला हा संतापजनक आहे. हा भ्याड हल्ला आहे’, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. शहिदांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे हे घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. पोलिसांची अतिरिक्त कुमक आणि भुसुरुंगविरोधी वाहनांचा ताफाही रवाना करण्यात आला आहे. शहिदांचे मृतदेह उचलण्यास आणखी उशीर होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.