समुद्राला मिळणारे पाणी गोदावरी खोऱ्यात, तेलंगणात जाणारे पाणी बोगद्यातून नळगंगेत! : मुख्यमंत्री

1190

कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये आणून मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र; तसेच वैनगंगेतून वाहून जाणारे पाणी वैनगंगा- नळगंगा बोगद्याच्या माध्यमातून पूर्व आणि पश्चिम विदर्भाला देऊन दुष्काळमुक्त करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न सुरु असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्र दुष्काळाच्या फेऱ्यातून मुक्त करण्याचा निर्धार आज स्वातंत्र्यदिनी त्यांनी पुन्हा व्यक्त केला. स्वातंत्र्याच्या 73 व्या वर्धापनदिनानिमित्त मंत्रालय येथे झालेल्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

राज्य शासनाने जलयुक्त शिवारच्या माध्यमातून राज्याला जलपरिपूर्ण करण्याचा प्रयत्न गेल्या पाच वर्षात केला, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, असे असताना गेल्या तीन चार वर्षात कमी पावसामुळे काही भागात दुष्काळाचे संकट अनुभवले आहे. त्यावर मात करण्यासाठी कोकणातून समुद्रात वाहून जाणारे 167 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यात येईल. तसेच वैनगंगा नदीचे तेलंगणात जाणारे पाणी वैनगंगा- नळगंगा योजनेत 480 कि.मी.चा बोगदा तयार करून पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात आणण्याचा प्रयत्न आहे. यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील सर्व अपूर्ण सिंचन प्रकल्प केंद्र सरकारच्या निधीतून गतीमानतेने पूर्ण करुन संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या संकटातून बाहेर काढण्याचा संकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीतून तिन्ही सैन्यदले, एनडीआरएफ, एसडीआरएफ, तटरक्षक दल आदींनी प्रचंड मेहनत करुन अव्याहत काम करुन करुन सुमारे 5 लाख नागरिकांची यशस्वी सुटका केली. पूरग्रस्त नागरिकांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी राज्य शासन भक्कमपणे पूरग्रस्तांच्या पाठिशी उभे आहे. पुनर्वसनासाठी 6 हजार 800 कोटींचे पॅकेज तयार केले असून ‍विक्रमी वेळेत पुनर्वसन केले जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्याला गेल्या पाच वर्षात सर्वच क्षेत्रात अग्रेसर करु शकलो. देशातील सर्वात भक्कम अशी राज्याची अर्थव्यवस्था आहे. औद्योगिक गुंतवणूकीमध्ये राज्य अग्रेसर असून देशातील एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी 50 टक्के गुंतवूणक एकट्या महाराष्ट्रात येते. देशाला 5 ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्य खंबीर पावले टाकत असून त्यामध्ये राज्याची 1 ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था बनवून आपला सहभाग नोंदविल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मनोगतानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस तसेच राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

आपली प्रतिक्रिया द्या