अभ्युदय नगरच्या धर्तीवर प्रतीक्षा नगरच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव म्हाडाने तयार करावा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; सर्वात मोठ्या सहकार भवनचे भूमिपूजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील सर्वात मोठे सहकार भवन प्रतीक्षा नगरमध्ये निर्माण होत आहे. या सहकार भवनाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. अभ्युदय नगरच्या धर्तीवर प्रतीक्षा नगरमधील पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी म्हाडाला यावेळी दिले. या उद्घाटन सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईत सहकार भवन असावे ही संकल्पना आमदार प्रवीण दरेकर यांनी मांडली व सातत्याने त्याचा पाठपुरावा केला.

प्रतीक्षा नगरमध्ये जवळपास 88 इमारती, ट्रान्झिट कॅम्प आहेत. 6 हजार 200 भाडेकरू येथे राहतात. तीस वर्षांपेक्षा जास्त काळ येथे झाला असल्याने काही इमारती धोकादायकही होत आहेत ज्या प्रकारे अभ्युदय नगरच्या पुनर्विकासाचा निर्णय घेतला त्याच प्रकारे प्रतीक्षा नगरचाही प्रस्ताव तयार करा. प्रतीक्षा नगरलाही म्हाडाच्या माध्यमातून उत्तम घरे देण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

मुंबईत मोठ्या प्रमाणावर स्वयंपुनर्विकासाच्या योजना सुरू झाल्या. मुंबई बँकेने स्वयंपूर्ण विकासाच्या क्षेत्रात सामान्य मुंबईकराला, मुंबईतील मराठी माणसाला त्याचे हक्काचे घर मिळण्याकरता दिलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. याप्रसंगी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री आशीष शेलार, मंगल प्रभात लोढा, महापौर रितू तावडे, मुंबई हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, मुंबई बँकेचे संचालक आमदार प्रसाद लाड, शिवाजीराव नलावडे, नंदकुमार काटकर आदि उपस्थित होते.