मुख्यमंत्र्यांचा पुन्हा ‘राग नाणार’, रिफायनरी प्रकल्पाचा फेरविचार करणार

580

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ‘राग नाणार’ आळवला आहे. या प्रकल्पाचे समर्थन करताना त्यांनी सरकार प्रकल्प रद्द करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करेल असे म्हटले आहे. आज या प्रकल्पाबाबत कोणताही निर्णय जाहीर करत नसलो तरी यासंदर्भात तुम्हाला पुन्हा भेटणार आहे, असे सांगायलाही मुख्यमंत्री विसरले नाहीत.

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज कोल्हापुरातून कणकवलीमार्गे रात्री राजापूरमध्ये पोहोचली. त्यावेळी नाणार परिसरातील काही मोजक्याच मंडळींनी त्यांची भेट घेतली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा नाणार राग आळवला.

नाणारमध्येच रिफायनरी झाली पाहिजे हे मी घसा फोडून सांगत होतो. हा ग्रीन रिफायनरी प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे एक लाख बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. मात्र ज्याप्रकारे या प्रकल्पाला विरोध झाला त्यामुळे हा निर्णय थांबविण्यात आला होता. पण इथे आल्यावर तुमचा उत्साह पाहिल्यानंतर या प्रकल्पाची पुन्हा एकदा चर्चा करावी असे मला वाटते आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

नाणारवासीयांच्या तीव्र विरोधामुळे आणि संघर्षामुळे राज्य सरकारने कोकणला विनाशकारी ठरणारा हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्र्यांनी मात्र आज भूमिका बदलल्याने कोकणात आश्चर्य व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या