
मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा बसविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.
शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते भास्कर जाधव यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले. शिवसेनेचे गटनेते अरविंद सावंत यांनी शिवरायांच्या पुतळ्याच्या विषयाचा लोकसभेत सतत पाठपुरावा केला. मात्र केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह यांनी पत्र पाठवून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा धोरणात बसत नाही, असे उत्तर दिले. त्यावर भास्कर जाधव यांनी बोट ठेवले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्रांगणाच्या दर्शनी भागात शिवरायांचा अतिशय भव्यदिव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याच्या संदर्भात केंद्राकडे पाठपुरावा करावा, त्यातील त्रुटी दूर कराव्यात आणि पुतळा उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अलीकडे देण्यात आलेले उत्तर हे जुन्या आराखडय़ाशी संबंधित असल्याचे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी स्वतः स्पष्ट केले आहे. नवीन आराखडय़ात शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्याचा प्रस्ताव असून त्याच्या अंतिम मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. नवीन आराखडा मंजूर झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर अत्यंत भव्य असा पुतळा उभारला जाणार आहे.


























































