तुमचा त्याग, समर्पण जग कदापि विसरणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोविडच्या या संकटात घर, कुटुंबाचे बंध बाजूला ठेवून, जिवाची पर्वा न करता रुग्णसेवेसाठी हजारो परिचारिका दिवसरात्र झटत आहेत. तुमच्या त्याग, समर्पणाला मानाचा मुजरा. तुमचे हे योगदान जग कदापिही विसरणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णसेवेत अथक परिश्रम घेणाऱया परिचारिकांविषयी गौरवोद्गार काढतानाच  जागतिक परिचारिका दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

नर्सेस-सिस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱया या परिचारिका-रुग्णसेविका कोविड योद्धय़ा आहेत. त्या कोविड-19 च्या पहिल्या लाटेपासून ते आतापर्यंत आघाडीवर राहून रुग्णसेवेत मेहनत घेत आहेत. आपले घर, कुटुंब यांची जबाबदारी सांभाळत त्यांनी रुग्णसेवेलाच प्रथम प्राधान्य दिले आहे. आजही त्या डॉक्टर्स आणि तज्ञांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. त्यामुळे हजारो रुग्णांना विषाणूशी लढण्याचे बळ मिळाले आहे. कित्येकांना बरे होऊन आपल्या कुटुंबात परतता आले आहे. या योगदानाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे कौतुक केले.