सर्वात उत्तम लस म्हणजे मास्क क्रांतिकारक पाऊल, मात्र खबरदारी घ्या! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

सर्वांनाच प्रतीक्षा असलेल्या कोरोनावरील लसीकरणाला झालेली सुरुवात म्हणजे क्रांतिकारक पाऊल असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी कोरोना अजून पूर्णपणे नष्ट झालेला नाही. त्यामुळे कोरोना जाईपर्यंत मास्क वापरणे, वारंवार हात धुणे आणि सामाजिक अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब केलाच पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. सर्वात उत्तम लस म्हणजे मास्क असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

पालिकेच्या ‘बीकेसी’ कोविड सेंटरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यव्यापी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. जून-जुलैमध्ये कोविड सेंटर रुग्णांनी भरून वाहत होते. दिवसरात्र तणाव होता. जगभरात सगळीकडे अशीच भयावह स्थिती होती. आजही ते दिवस आठवले की अंगावर काटा येतो.

यावेळी केवळ 15 दिवसांत उभारलेल्या बीकेसी कोविड सेंटरसारख्या सुविधांचा मोठा उपयोग ठरल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचाऱयांनी  जिवाची पर्वा न करता रुग्णांना सुविधा देत लाखो जणांचे प्राण वाचवले.

अशा कोविड योद्धय़ांना आपण मानाचा मुजरा करीत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सद्यस्थित कोरोना नियंत्रणात आला आहे. रुग्ण नसल्याने कोविड सेंटर ओस पडत चालली आहेत. हे चित्र असेच राहो अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

आपल्याला कोरोनाचा शेवट करायचा आहे. आता लस आली आहे. मात्र कोरोना पूर्णपणे नष्ट होईपर्यंत आपल्याला आवश्यक खबरदारी घ्यावीच लागेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. लसीकरणासाठी सर्वात मोठी गरज आणि हक्क असणाऱया आरोग्य कर्मचारी कोविड योद्धय़ांना प्राधान्य देण्यात येत आहे. अन्यथा मुख्यमंत्री म्हणून मीच पहिली लस घेतली असती, असेही ते म्हणाले.

कोविड योद्धय़ांना लस मोफतच

सद्यस्थितीत लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोविड योद्धय़ांना लस दिली जात असून ही लस मोफत दिली जाणार आहे. दुसऱया टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर्सना लस दिली जाणार आहे. तर आगामी काळात केंद्र सरकारकडून मिळणारा लसींचा पुरवठा आणि लसींची किंमत यावरूनच सर्वसामान्यांना मोफत लस देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

लसीचा पुरवठा, लसीकरणाचे नियंत्रण केंद्र सरकार, राज्य सरकार, पालिका यांच्या माध्यमातून होत असल्यामुळे लसीचा काळाबाजार होणार नाही असेही त्यांनी सांगितले. राज्याचे नागरिक म्हणून मला सर्वजण सारखेच आहेत. देशाच्या पंतप्रधानांनाही ते सारखेच आहेत. त्यामुळे लस कुणाला जास्त, कुणाला कमी याबाबत मला राजकारण करायचे नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले. सर्वसामान्यांसाठीही लवकरच लस उपलब्ध होईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

लसीबाबत कोणतीही शंका नको!

केंद्र सरकारच्या आरोग्य विभागामार्फत लसीच्या सुरक्षेबाबत आवश्यक  बाबींची खात्री करूनच लसीचा पुरवठा करण्यात येत आहे. कोणत्या लसीचा पुरवठा करावा याचा निर्णय केंद्र सरकारकडून सर्व बाबींची खात्री करूनच घेतला जातो. त्यामुळे आता पुरवठा झालेल्या लसीबाबत कोणताही शंका-संभ्रम नको, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

सिरम आणि बायोटेकसह आणखी दोन ते तीन कंपन्यांची चाचणी सुरू आहेत. त्यामुळे लवकरच लसींची उपलब्धता वाढेल. आजही ते दिवस आठवले तर अंगावर काटा येतो. दिवसरात्र तणाव होता. जगभरात सगळीकडे अशीच स्थिती होती, हॉस्पिटलं पुरत नव्हती.

युद्धकालीन परिस्थितीसारखे आपण 15 दिवसांत हे सेंटर उभारले आणि इथून सुरुवात केल्यानंतर मुंबईत अनेक ठिकाणी तसेच राज्यभरात आपण अशी सेंटर्स उभारली. या सेंटर्सचा मोठा आधार आपल्याला लाभला. आज हे सेंटर ओस पडलेले आहे ते असेच राहो अशी प्रार्थना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

एक कोटी लस साठवणुकीची क्षमता

मुंबईत एकाच वेळी एक कोटी दोन लाख लस साठवणुकीची क्षमता असल्याचे इकबाल सिंह चहल यांनी सांगितले. कांजुरमार्ग, परळ यासोबतच अन्य सहा ठिकाणी साठवणूक क्षमता असून लसीकरणासाठी 500 पथके व दिवसाला 50 हजार जणांना लसीकरणाची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश वाकाणी, बीकेसी कोविड सेंटरचे डीन डॉ. राजेश ढेरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या