हा देश कोणाची खासगी मालमत्ता नाही! महाराष्ट्र तर नाहीच नाही!! 

शेतकरी आंदोलन, इंधन दरवाढ, अहमदाबादच्या स्टेडियमचे नामांतर, चीनची घुसखोरी आदी विषयांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला की पळे, अशी केंद्र सरकारची भूमिका असल्याची बोचरी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. देश म्हणजे तुमची खासगी मालमत्ता नाही आणि महाराष्ट्र तर नक्कीच नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोरोना संकट आणि शेतकऱ्यांच्या मुद्दय़ावरून राजकारण करणाऱ्या विरोधकांना ठणकावले.

‘मी जबाबदार’ ही मोहीम बेजबाबदारांचे डोळे उघडण्यासाठी आहे. मला वाईट म्हटलं तरी चालेल, मी वाईटपणा घेईन. माझी थट्टा करा पण जनतेच्या जिवाशी खेळ करू नका, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सुनावले. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या टीकेचा तर खरपूस समाचार घेतलाच, पण केंद्रातील मोदी सरकारवरही तिखट शब्दांत टीका केली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाच्या प्रस्तावरील चर्चेदरम्यान विरोधकांकडून कोरोना, शेतकरी, हिंदुत्व, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वारंवार उल्लेख करत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व अन्य भाजपा सदस्यांनी केला होता. हाच धागा पकडत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘बाळासाहेबांची आठवण तुम्ही वेळोवेळी काढली. त्यांना विसरला नाहीत. त्याबद्दल धन्यवाद. पण त्यांचे हिंदुत्व तरी विसरू नका. त्यांचे हिंदुत्व हे शेंडी आणि जानव्याचे हिंदुत्व नव्हते, असा टोला हिंदुत्वाचा आव आणणाऱ्या भाजप नेत्यांना त्यांनी लगावला.

शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला तर पळे

संत नामदेवांच्या मुद्दय़ाचा अभीभाषणात उल्लेख नसल्याचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, संत नामदेवांचं स्मरण व्हायलाच हवं. आपण एकत्र बसून आपल्या राज्यातील जी अनमोल रत्न आहेत त्यांची नावे काढू. त्यांच्याविषयीचं ऋण व्यक्त करण्यासाठी आपण हे करूच.

संत नामदेव महाराष्ट्रातील मराठी मातीचा पुत्र, मात्र पंजाबात जाऊन त्यांनी काम केलं. आज पंजाबचा शेतकरी रस्त्यावर आहे. त्याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे. आपल्याकडच्या शेतकऱ्यांची काळजी आपण वाहिलीच पाहिजे.पण जे शेतकरी आंदोलनासाठी बसले आहेत. त्यांची वीज कापली जाते, त्यांची शौचालये तोडली जातात. ते देशाच्या राजधानीत येऊ नयेत म्हणूत त्यांच्या मार्गात खिळे टाकले जातात, पुंपण टाकले जातेय. ज्या तारांचं पुपण देशाच्या सीमेवर असायला हवं ते शेतकऱ्यांसाठी राजधानीत टाकलं जातंय. म्हणजे शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला तर पळे. हा बंदोबस्त तिथे केला असता तर चीन घुसला नसता, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.

हिंदुत्वाच्या गप्पा आम्हाला शिकवू नका

बाबरी पाडताना येरेगबाळे पळून गेले. बाळासाहेब शिवसैनिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते. शिवसेनाप्रमुखांनी म्हटले, जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली असेल तर मला अभिमान आहे आणि हे म्हणाले, आम्ही नाही पाडले. राममंदिरासाठी आता घरोघर पैसे मागता. पण नाव मात्र आमचे राहिले पाहिजे हा तुमचा आग्रह आहे. कश्मीर पंडित निर्वासित होऊन जगत होते तेव्हा शिवसेनाप्रमुखांमुळे कश्मिरी पंडितांना हक्काचे स्थान मिळाले. आमचे हिंदुत्व काढत असताना कश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांबरोबर सत्ता स्थापन केली तेव्हा पुठे गेले होते तुमचे हिंदुत्व. हिंदुत्वाच्या गप्पा आम्हाला शिकवू नका, तुम्ही त्याला पात्र नाही,’ असा घणाघात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.

बाळासाहेबांच्या खोलीत झालेली चर्चा कशी विसरलात?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण तुम्ही ठेवलीत त्यासाठी मी आभारच मानेन पण तुम्हाला आताच बाळासाहेबांचे उमाळे का येत आहेत, हा प्रश्न मला पडला आहे. बाळासाहेबांच्या खोलीत जेव्हा अमित शहा आणि माझी चर्चा झाली तेव्हा देवेंद्र फडणवीसांना दाराबाहेर ठेवलं होतं. आतमध्ये आम्ही फक्त दोघेच होतो. या बंद दाराआड झालेली चर्चा तुम्ही निर्लज्जपणे बाहेर येऊन नाकारता? हेच तुमचे हिंदुत्व आहे का? हेच तुमचं बाळासाहेबांवरचं प्रेम आहे का?, 2014 ला युती तुम्ही तोडली तेव्हाही आम्ही हिंदू होतो, आजही आहोत, उद्याही राहू, असे खडेबोल उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांना सुनावले.

शर्जिलला पाताळातूनही शोधून काढू

‘शर्जिल उस्मानी ही उत्तर प्रदेशमधली घाण आहे. आमच्याकडची नाही. विरोधी पक्षनेते म्हणाले होते तो पाताळात गेला तरी आम्ही शोधून काढू. पण मग कधी जाणार? पाताळात नाही, त्याला शोधायला कधी जाणार? उत्तर प्रदेशात नुसतं राम मंदिर बांधून चालणार नाही. पाया ठिसूळ असेल आणि तिथे अशी देशद्रोही पिलावळ असेल आणि तिचं पालनपोषण उत्तर प्रदेशात होत असेल तर उगाच आमच्या अंगावर येऊ नका. शर्जिल उस्मानीला अटक केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि त्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने आम्हाला मदत करावी. पाया ठिसूळ आणि राम मंदिर बांधताय त्याला अर्थ नाही’, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

सावरकरांना ‘भारतरत्न’ का नाही?

‘तुमचा आमचा आणखी एक आवडता विषय म्हणजे सावरकर,’ असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावरकरांच्या विषयावरून होणाऱ्या टीकेवरून विरोधकांवर आसुड ओढले. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘सावरकरांना ‘भारतरत्न’ द्या हे पत्र दोन वेळा केंद्र सरकारला गेलं आहे. देवेंद्रजी, आपण मुख्यमंत्री होता. 20/8/2018 आणि 17/1/2019 या दोन तारखांना सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्यासंदर्भातील शिफारस पत्र सरकारकडून पाठवण्यात आलं आहे. कोण देतं हो भारतरत्न? आपली काही आमदारांची कमिटी आहे का? भारतरत्न देण्याचा अधिकार देशाच्या पंतप्रधानांना आणि केंद्रीय समितीला आहे. का दिलं जात नाही हो सावरकरांना भारतरत्न’, असा सवाल त्यांनी केला.

‘वल्लभभाईंचं नाव पुसून टाकता. सावरकरांना भारतरत्न देत नाही आणि आम्हाला शिकवता संभाजीनगर करा? आम्ही संभाजीनगर जरूर करू; पण त्याआधी हे सांगा की, विधानसभेमध्ये आपण संभाजी नगर विमानतळाचं नामकरण केलं आहे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, पण कोणाच्या दारी ते अडून ठेवलं आहे?,’ असा सवाल करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा केंद्रावर निशाणा साधला. ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुपुत्राचं नाव विमानतळाला देत नाही आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता?,’ असा टोलाही त्यांनी लगावला.

मेट्रो कारशेडबाबत एकत्र बसून मार्ग काढू

मेट्रो-3 लाइनचा खर्च 10 हजार कोटींनी वाढलेला आहे. आपण जे म्हणता की नवीन कारशेड करताना त्याचा एवढा खर्च वाढेल, पण याला पुठेही स्थगिती दिलेली नाही तरी त्याची किंमत वाढली आहे. आम्ही काय नाही केलं, ती तेव्हाची फाइल आता आली आहे. म्हणजे आणखी कर्जावर कर्ज घेत जायचं? खर्च कसा वाढतोय? खर्च करायच्या आधी टेंडरमध्ये या गोष्टी नमूद नव्हत्या का, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. ते पुढे म्हणाले, लाइन-6 चे टेंडर काढले, पण डेपोचा पत्ता नाही. कांजूरची जी जागा आहे त्याबद्दल नम्रपणे सांगतो की कोणी प्रतिष्ठsचा विषय करू नये. अहवालानुसार आरेची जागा कमी पडणार, त्याच्यानंतर चार, चार ए करण्यासाठी गरज लागणार आहे. मग कांजूरच्या जागेवर कारशेड करूया. तिथे केल्यानंतर कनेक्टिव्हिटी थेट अंबरनाथपर्यंत वाढतेय. आरेचं जंगल सुरक्षित राहते आहे. जर अधिक चांगला मार्ग निघत असेल तर केंद्र म्हणते ही जागा त्यांची, आपण म्हणतो आपली आहे. जसं सीमाप्रश्नावर, मराठी भाषेवर आपण एकत्र येत आहोत तसं आपण एकत्र येऊ आणि काही तरी राज्याला देऊ. जर मेट्रो हा प्रकल्प दोन्ही सरकारचा मिळून असेल तर तुझं माझं कशाला, आपण एकत्र बसून मार्ग काढला तर हा विषय सुटू शकेल.

इंधन दरवाढ आत्मनिर्भर होण्यासाठी?

सुधीर मुनगंटीवर यांनी त्यांच्या भाषणात शिवभोजन योजनेवर टीका केली त्याचा समाचार मुख्यमंत्र्यांनी जोरदार शब्दात घेतला. पाच रुपयांमध्ये थाळी दिली, तुम्ही खाणार का आम्ही खाणार असे म्हणालात. पण मी राष्ट्रपतींचे भाषण ऐकले. आणि राष्ट्रपती काय म्हणाले की, कोरोना काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेत 8 महिन्यात 80 कोटी लोकांना अतिरिक्त पाच किलो धान्य मोफत केल्याचा उल्लेख केला आहे. यामुळे गरीब श्रीमंत झाले का? पाच किलो आठ महिन्यांसाठी लागले. नंतर गरीब अचानक ते श्रीमंत झाले! मग इंधन, पेट्रोल वाढ, डिझेल वाढ झाली तरी चालेल, पण गरीबांनी गरीब राहता कामा नये. आत्मनिर्भर झाले पाहिजे. आत्मनिर्भर होण्यासाठी पुवत वाढली पाहिजे म्हणून इंधनाची दरवाढ करीत आहोत. गरीबालाही कमावून त्यांच्या घरी अन्नधान्य शिजवता आले पाहिजे (यावर सत्ताधारी बाकावरून शेमशेमच्या घोषणा दिल्या), असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी ठणकावले.

कानडी सरकारची सक्ती मोडून काढू

राज्यपालांच्या भाषणावर पुन्हा येताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यपालांनी सीमाप्रश्न मांडला खरंच मी धन्यवाद देतो. देवेंद्र फडणवीस मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. कारण राज्याची अस्मिता अशी असली पाहिजे. राजकीय अभिनिवेष जोडे वगैरे असतातच, पण काही गोष्टी अशा असतात की जोडे, अभिनिवेश बाजूला ठेवून राज्यासाठी एकत्र यावे लागते. त्याच्यासाठी सोबत येण्याचे आपण मान्य केले आहे. त्यासाठी महाराष्ट्रातीलच नव्हे तर सीमा भागातील मराठी बांधवाच्या माता-भगिनींच्या वतीने धन्यवाद देतो. चला आपण केंद्राकडे जाऊ आणि मराठी बांधवांवर कर्नाटक सरकार कानडीची सक्ती कशी लादते ती मोडून काढू, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

कृपा करून मिथ्य सोडा

कोरोनाच्या कामगिरीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेचा मुखमंत्र्यांनी जोरदार शब्दांत समाचार घेतला. त्यापूर्वी त्यांनी समर्थ रामदास स्वामींच्या ओळी ऐकवल्या. मुख्यमंत्री म्हणाले, मना सर्वथा सत्य सोडू नको रे.. मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे… मना सत्य ते सत्य वाचे वदावे…मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे… असे सांगून कृपा करून आता तरी मिथ्य सोडा असे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बघून मुख्यमंत्री म्हणाले, जे काही सत्य आहे त्याचा अंगीकार करा, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.

गोष्ट नारायण भंडारीची

विरोधकांनी टीका करताना नारायण भंडारीची गोष्ट सांगितली होती, यावर मला ती भंडारीचीच गोष्ट आठवली असे सांगताना माधव की नारायण भंडारी? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. एका सदस्याने नारायण असे नाव घेतले तेव्हा दोघेही दिव्यच आहे असा टोला मारताच सभागृहात जोरदार हशा पिकला. नारायण भंडारीची लहानपणीची कथा तुम्ही सांगितली. पण नारायण भंडारीला मोठा करणार की नाही? असा प्रतिप्रश्न विरोधी पक्ष नेत्यांना केला. येवढे मोफत अन्नधान्य-शिवभोजन खाऊन नारायण भंडारी मोठा होतो असा उल्लेख करताच सभागृहात पुन्हा हंशा उसळला. त्यानंतर मुख्यमंत्री ही गोष्ट सांगताना पुढे म्हणाले, नारायण भंडारी मोठा होऊन अनेक वर्षानंतर गावी जातो. गावी जाऊन गुरुजींना भेटतो. गुरुजींच्या दारात मोठी गाडी उभी राहते. त्याच्यातून नारायण भंडारी उतरतात आणि गुरुजींच्या घरी जातात आणि गुरुजी ओळखले का मला असा प्रश्न विचारतात. गुरुजी म्हणतात तुला कोण नाही ओळखणार तू तर गांजापासून पतंगाच्या मांजापर्यंत आणि न्यूयॉर्कपासून आपल्या गावापर्यंत आणि जमिनीवरच्या पाण्यापासून मंगळावरच्या पाण्यापर्यंत बोलतोस. हे मी तर तुला शिकवले नाही मग तू कसा शिकलास असा प्रश्न गुरुजी करतात. त्यावर मला नवीन गुरू सापडला असे सांगत नारायण भंडारी पुढे म्हणतो की, मी आज ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात असेच बोलावे लागते. माहिती नसेल तरी जोरात बोलावे लागते. तसे मी बोलतो. त्यावर गुरुजी आनंदित होतात. मग तू सांग आता कसा आलास असा प्रश्न गुरुजी करतात. त्यावर आता मी सरकारच्या कोविड काळातल्या आरोग्य सेवेवरच्या भ्रष्टाचारावर टीका करायला आलो आहे. गुरुजी त्यावर म्हणतात बरे झाले काही तरी तू चांगले केलेस, आता आलाच आहेस तर जेवून जा, त्यावर नारायण भंडारी म्हणतो, जेवणार कसा मला एका प्रेस काँन्फरन्सला जायचे आहे. गुरुजी विचारतात आता कसली प्रेस काँन्फरन्स? तेव्हा मघाशी मी हाँस्पिटलमधील भ्रष्टाचार बाहेर काढला आता हाँस्पिटलमध्ये ज्यांनी लाच घेतली त्यांच्यावर कारवाई कराल तर याद राखा खबरदार, आम्ही ठामपणे त्यांच्या पाठिशी उभे आहोत हे सांगण्यासाठी मी प्रेस काँन्फरन्स घेत असल्याचे नारायण भंडारीने गुरुजींना सांगितले. ही गोष्ट मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगताच त्यांनी नक्की कोणाला उद्देशून हा टोला लगावला हे सर्व सदस्यांच्या त्वरीत लक्षात आले आणि पुन्हा हशा उसळला.

कोरोना म्हणतोय, मी परत येईन!

कोरोनाची साखळी तोडायची असेल तर लॉकडाउन हा प्रभावी उपाय आहे.मात्र मला गोरगरीबांची चूल विझवायची नाही. आपण आता आरोग्य सुविधा वाढवत आहोत. राज्यातील जनतेच्या जिवाची सर्वतोपरी काळजी घेणे हे माझे कर्तव्य आहे.त्यासाठी मला कोणी व्हिलन ठरविले तरी चालेल. मला त्याची पर्वा नाही. मी माझ्या राज्याशी बांधील आहे. काही चुकीचे होत असेल तर निश्चित कारवाई करू, पण खोटे आरोप आणि थट्टा कोणी करू नये. कारण व्हायरस कोणाला ओळखत नाही. आता तो मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन म्हणत परत यायचा प्रयत्न करत आहे. पण ही दुसरी लाट आपल्याला थोपवायची आहे. त्यासाठी मास्क, शारीरिक अंतर, सॅनिटायझर या त्रिसूत्रीचा अवलंब करावाच लागेल असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी केंद्राकडे खासगी रुग्णालयांसाठी आपण परवानगी मागितली होती. 29 रुग्णालयांना आता मान्यता मिळाल्याचेही ते म्हणाले.

मराठी भिकारी आहे का? आम्ही कटोरा घेऊन दिल्लीच्या दारात उभे आहोत का?

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडे प्रलंबित असल्याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मुख्यमंत्री म्हणून माझ्या कार्यकाळातील दुसरा मराठी भाषादिन झाला. त्या मराठी भाषादिनानिमित्त आम्ही म्हणत असतो की, मराठी भाषेला आम्ही अभिजात भाषेचा दर्जा देऊ. आम्ही म्हणजे, कोण देणार आहे? आमच्याकडून ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सर्व देण्यात आल्या आहेत. आणखी काही लागल्या तर त्याही देऊ; मात्र अजूनही केंद्राकडून माझ्या या मातृभाषेला तिष्ठत उभं ठेवलं आहे,’ असे सांगतानाच मुख्यमंत्री ठाकरे यांनी संतप्तपणे ‘मराठी भिकारी आहे का? महाराष्ट्र भिकारी आहे का? आम्ही काय कटोरा घेऊन त्या दिल्लीच्या दारामध्ये उभे आहोत, असा सवाल केला.

सुधीरभाऊंना बघताना नटसम्राटचा भास झाला!

सुधीरभाऊ, मी माझ्या केबिनमध्ये बसून कामकाज करीत असताना अचानक भास झाला की, मी नटसम्राट बघत आहे. मी अथेल्लो, मी अमुक..तमुक… पण त्याचा शेवट केविलवाणा वाटला. कोणी किंमत देता का किंमत..? काय तुमचा आवेश…तो पाहून देवेंद्र फडणवीस यांना भीती वाटायला लागली, की आमचे कसे होणार? कारण ज्या तडफेने तुम्ही बोलत होतात ते अप्रतिम! काही काही वेळा माझे जसे झाले तसे तुमचे झाले असे मला वाटते. कारण इथे आल्यानंतर कलागुणांना वाव मिळत नाही असे मला वाटते. (हशा) मी फोटोग्राफर आहे. गडकिल्ल्यांची फोटोग्राफी केली. पण आता बंद आहे. सुधीरभाऊ, तुमच्यातील कलाकार लपून राहत नाही. जिथे जिथे संधी मिळते तिथे तो उफाळून येतो. उचंबळून येतो. कला ही जन्मजात असायला लागते. ती तुमच्यात आहे. ती मारू नका. ती जिवंत ठेवा. (पुन्हा हंशा) धडाडती असली पाहिजे, असा जोरदार टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावताच काही सेपंद सभागृहात हास्यस्पह्ट झाला.

आम्ही पाच रुपयांमध्ये शिवभोजन थाळी देत आहोत. गरीबांचे पोट भरत आहोत. भरलेली थाळी देत आहोत. रिकामी थाळी वाजवत नाही. तुम्ही अचानक घोषणा देता आणि रिकामी थाळी वाजवायला सांगता. भरलेली थाळी व रिकामी थाळी हा या सरकारमधील फरक आहे.

  • आता भारतीय क्रिकेट टीम प्रत्येक मॅच जिंकणार आहे; कारण वल्लभभाईंचे नाव बदलून स्वतःचे नाव देण्यात आले आहे.
  • ‘तुम्ही आमचं हिंदुत्व सांगता. पण संघमुक्त भारत करण्याची घोषणा करणाऱ्या नितीश कुमारांना डोक्यावर घेऊन तुम्हाला गणपती बाप्पा मोरया करावं लागतंय. काय हे तुमचं दुर्दैव! रामविलास पासवानांना मांडीवर घ्यावं लागलं. काय तुमचं हिंदुत्व आणि काय हे… छे!’
  • आरएसएस तुमची मातृसंस्था आहे, ती कधीही स्वातंत्र्यलढय़ात नव्हती. म्हणून ‘भारत माता की जय’ बोललं की देशप्रेम सिद्ध होत नाही.
  • विदर्भ माझे आजोळ आहे. त्याला वेगळा कदापि होऊ देणार नाही असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
  • राजकारण, आरोप-प्रत्यारोप, मत्सर, द्वेष हे सर्व काही काळ बाजूला ठेवून महाराष्ट्रच्या समृद्धीसाठी सहकार्य करा.
आपली प्रतिक्रिया द्या