मिशन ऑक्सिजन! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

कोविडच्या संकटाने सगळय़ांनाच खूप मोठा धडा दिला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करत आहोत, असे सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ‘मिशन ऑक्सिजन’ची घोषणा केली. राज्यातील ऑक्सिजन निर्मिती पंधराशे मेट्रीक टनापर्यंत वाढवण्याचे नियोजन असून कोविड केंद्रांचीही संख्या वाढवणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पेटीएम फाऊंडेशनच्या वतीने राज्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर आणि लसीकरणासाठी राज्य शासनाला सहकार्य करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने दृरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, विकास होत राहील. पण जीव वाचले, तर विकासाला खरा अर्थ आहे. आपण विकास, विकास म्हणून ज्याच्या मागे धावत होतो. त्या विकासाने आपल्याला तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाही. आता आपल्याला ऑक्सिजनच्या मागे धावावे लागत आहे. कोरोनाने आपल्याला धडा दिला आहे. त्यामुळे येणाऱया काळातील आव्हानांना तोंड देण्याची तयारी आतापासूनच आम्ही सुरू केली आहे. पहिल्या लाटेत आम्ही खूप सुविधा जाणीवपूर्वक वाढवल्या. पण त्याही आता अपुऱया पडू लागल्या आहेत. त्यामुळे आता लसीकरण सुरू झाल्यानंतरही आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर आहे. आता जुलैनंतर पावसाळ्यामुळेही अनेक साथीचे आजार पसरू लागतात. त्यांना तोंड देण्यासह कोविडची तीसरी, चौथी आणि अशा कितीही लाटा आल्या तरीही त्यांना थोपविण्यासाठी, लोकांना उपचार मिळावेत यासाठी जास्तीत जास्तीत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ऑक्सिजन हे आता औषध ठरल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील ऑक्सिजन निर्मिती पंधराशे मेट्रीक टनांपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे. त्याशिवाय ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध होतील, असे प्रयत्न आहेत. त्यामध्ये तात्पुरत्या आणि दीर्घकाळाचे असे नियोजन आहे. रुग्णशय्यांची संख्या, तसेच कोविड केंद्रांचीही संख्या वाढवणार आहोत.

पेटीएम फाऊंडेशनने ऑक्सिजन निर्मिती, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर आणि लसीकरणात लसीकरणासाठी सरकारी यंत्रणांना सहकार्य करण्यासाठी, लस उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक सहाय्याचीही तयारी दर्शवली आहे. या सगळ्या सहकार्याचे आणि पुढाकाराचेही मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले.

बैठकीस राज्याचे मुख्य सचिव सीताराम पुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱहाड, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय आणि पेटीएम-फाऊंडेशनचे विजय शेखर-शर्मा, सोनिया धवन, राजेंद्र गुल्हर आदी उपस्थित होते.

विकास होत राहील. पण जीव वाचले, तर विकासाला खरा अर्थ आहे. आपण विकास, विकास म्हणून ज्याच्या मागे धावत होतो. त्या विकासाने आपल्याला तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाही. आता आपल्याला ऑक्सिजनच्या मागे धावावे लागत आहे.
– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न देशासाठी मार्गदर्शक

पेटीएम फाउंडेशनचे विजय शेखर-शर्मा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोविड उपाययोजनांसाठीच्या सातत्यपूर्ण प्रयत्न आणि पुढाकाराचे कौतुक केले. कोविडच्या लाटेला रोखण्यासाठी मास्क वापरासह, लसीकरणाच्या माध्यमातून करण्यात येणाऱया उपाययोजनांमध्ये महाराष्ट्राने पुढचे पाऊल टाकले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या दूरदृष्टिकोनातून सुरू असलेले प्रयत्न देशासाठी मार्गदर्शक असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

कोरोनाने आपल्याला धडा दिला आहे. त्यामुळे येणाऱया काळातील आव्हानांना तोंड देण्याची तयारी आतापासूनच आम्ही सुरू केली आहे. पहिल्या लाटेत आम्ही खूप सुविधा जाणीवपूर्वक वाढवल्या. पण त्याही आता अपुऱया पडू लागल्या आहेत. त्यामुळे आता लसीकरण सुरू झाल्यानंतरही आरोग्या सुविधा वाढविण्यावर भर आहे. कोविडची तीसरी, चौथी आणि अशा कितीही लाटा आल्या तरीही त्यांना थोपविण्यासाठी, लोकांना उपचार मिळावेत यासाठी जास्तीत जास्तीत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. राज्यातील ऑक्सिजन निर्मिती पंधराशे मेट्रीक टनांपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे. त्याशिवाय ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध होतील, असे प्रयत्न आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या