आता ‘आपलं सरकार’; पालिकेमुळे मुंबईचा सर्वांगीण विकास होणार! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

चारही बाजूंनी उभी आणि आडवी वाढणाऱ्या मुंबईत उपलब्ध सुविधांवर ताण पडत आहे. वाहतूककोंडी होत आहे. मात्र सागरी मार्ग, मेट्रो, नवे रस्ते-पुलांमुळे हा खोळंबा दूर होणार आहे. मुंबईच्या विकासासाठी आपल्याकडे आधी फक्त महानगरपालिका होती, मात्र आता राज्य सरकारही आपलंच आहे, त्यामुळे मुंबईचा सर्वांगीण विकास होईल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी पालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतील महालक्ष्मी येथील उड्डाणपूल, केबल ब्रीज, लोअर परळ डिलाईल पूल जोडरस्त्यांचे भूमिपूजन, मियावाकी गार्डन आणि वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील देशातील पहिलेच पक्षी विहार, प्राण्यांच्या अद्ययावत-नैसर्गिक दालनांचे लोकार्पण करण्यात आले.

मुंबईत जन्मलेला पहिला मुख्यमंत्री म्हणून मुंबईच्या समस्या, व्यथा पाहत आलो आहे. त्या आता प्राधान्याने सोडवायच्या आहेत. त्यामुळे मुंबईच्या विकासासाठी पालिकेचे जे प्रकल्प असतील ते तातडीने सरकारकडे आणा. त्यांना तातडीने मंजुरी देऊन काम करू, असे आश्वासनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.

यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर ऍड. सुहास वाडकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, राहुल शेवाळे, आमदार यामिनी जाधव, अजय चौधरी, प्रकाश फातर्पेकर, मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री अस्लम शेख, मिलिंद नार्वेकर, विनायक मेटे, सुनील शिंदे, सचिन अहीर, दगडू सकपाळ, ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष अनिल पाटणकर, नगरसेविका श्रद्धा जाधव, हेमांगी वरळीकर, स्नेहल आंबेकर, नगरसेवक आशीष चेंबूरकर, समाधान सरवणकर, अरविंद भोसले, रमाकांत रहाटे, तृष्णा विश्वासराव, वैशाली शेवाळे, पालिका आयुक्त प्रवीण परदेशी अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱहाड, विजय सिंघल यांच्यासह नगरसेवक, पालिका अधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

‘मियावाकी’मुळे मुंबईतील प्रदूषण कमी होणार

वडाळा भक्ती पार्क येथे पालिकेच्या संकल्पनेतील जापनीज पद्धतीच्या ‘मियावाकी गार्डन’ प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला. या महत्त्वाकांक्षी वनीकरण मोहिमेत मुंबईत 64 प्लॉटची निवड करण्यात आली असून या जागांवर 3 लाख 77 हजार झाडे लावण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, ‘मियावाकी वन’ पद्धतीत सामान्य वृक्ष लागवडीपेक्षा 30 पट जास्त झाडांची लागवड करता येणार असून अवघ्या तीन वर्षांत ही वने ‘मेंटेनन्स-प्री’ होणार आहेत. अशा प्रकल्पांमुळे मुंबईतील प्रदूषण कमी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

राणीबागेत ब्रीडिंग-संवर्धन, रेस्क्युड ऑनिमल पुनर्वसन केंद्र – आदित्य ठाकरे

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाचे नूतनीकरण, पेंग्विनसह नवीन आलेल्या नवीन पक्षी-प्राण्यांमुळे मुंबईकर- पर्यटकांची गर्दी प्रचंड वाढत आहे. त्यामुळे आगामी काळात या ठिकाणी आणखी अनोख्या योजना सुरू करण्यात येतील. यामध्ये पक्षी-प्राण्यांचे ब्रीडिंग-संवर्धन आणि रेस्क्युड ऑनिमल पुनर्वसन केंद्र सुरू करण्याबाबत विचार सुरू असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

राणीबागेत आतापर्यंत केवळ पिंजऱ्यातले प्राणी पाहता येत होते. मात्र आता ही कन्सेप्ट बदलली असून नव्या पद्धतीत पक्षी-प्राण्यांसाठी नैसर्गिक अधिवास तयार करून त्यांचे संवर्धन सुरू असल्याचे असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले. नव्या बिबटय़ा, तरस यांच्या, कोल्हा, अस्वल आणि पक्षीविहारामुळे पर्यटकांचे आकर्षण आणखी वाढेल असेही ते म्हणाले. हा प्रकल्प राबवण्यासाठी मेहनत घेणारे संचालक डॉ. संजय त्रिपाठी, सुधीर नाईक यांचेही कौतुकही आदित्य ठाकरे यांनी केले.

लोअर परळ आणि महालक्ष्मी येथील केबल बीज व उड्डाणपूल कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, राहुल शेवाळे आदी उपस्थित होते. महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ डॉ. ई. मोझेस रोडवर होणारा उड्डाणपूल, केशवराव खाडय़े मार्गावर होणारा केबल ब्रीज आणि डिलाईल पुलाच्या जोडरस्त्यांच्या कामांमुळे एल्फिन्स्टन, लोअर परळ आणि महालक्ष्मी परिसरातील वाहतूककोंडी फुटण्यास मदत होणार आहे. या कामांसाठी पालिका 884 कोटींचा खर्च करणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या