
चारही बाजूंनी वाढणार्या मुंबईतील सुविधांवर ताण पडत आहे. सुविधा कमी पडत आहेत. वाहतूक कोंडी होत आहे. मात्र सागरी मार्ग, मेट्रो, नवे रस्ते-पुलांमुळे हा खोळंबा दूर होणार आहे. मुंबईच्या विकासासाठी आधी फक्त महानगरपालिका होती, मात्र आता राज्य सरकारही आपलंच आहे, त्यामुळे मुंबईचा सर्वांगिण विकास होईल असा ठाम विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी पालिकेच्या महत्त्वाकांशी प्रकल्पांतील महालक्ष्मी येथील उड्डाणपूल, केबल ब्रीज, लोअर परळ डिलाईल पूल जोडरस्त्यांचे भूमिपूजन, मियावाकी गार्डन आणि वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील देशातील पहिलेच पक्षी विहार, प्राण्यांच्या अद्ययावत-नैसर्गिक दालनांचे लोकार्पण करण्यात आले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतानाच शिवतीर्थावर आविष्कार झालेल्या देशाच्या संस्कृती-परंपरांच्या सादरीकणाबद्दल गौरवोद्गार काढले. दरवर्षी हा सोहळा टीव्हीवर पाहायचो, मात्र जनतेमुळे देशाचे वैभव प्रत्यक्ष पाहता आले असेही ते म्हणाले. झपाट्याने वाढणार्या मुंबईत नागरी सुविधाही वेगाने वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. सागरी मार्ग, मेट्रो, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, नॅशनल पार्कमधील भुयारी मार्ग, शिवडी-न्हावा शेवा प्रकल्प आणि नवे रस्ते-पुलांमुळे मुंबईतील वाहतूककोंडी फुटण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुंबईत जन्मलेला पहिला मुख्यमंत्री म्हणून मुंबईच्या समस्या, व्यथा पाहत आलो आहे. त्या आता प्राध्यान्याने सोडवायच्या आहेत. मुंबईच्या विकासासाठी पालिकेचे जे प्रकल्प असतील ते तातडीने सरकारकडे आणा. त्यांना तातडीने मंजुरी देऊन काम करू असेही ते म्हणाले. महानगर पालिकेच्या माध्यमातून मुंबईकरांना दर्जेदार आणि अद्ययावत सुविधा देण्यासाठी अनेक मोठे प्रकल्प राबवण्यात येत आहे. यामध्ये महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ डॉ. ई. मोझेस रोडवर होणारा उड्डाणपूल, केशवराव खाड्ये मार्गावर होणारा केबलब्रीज आणि डिलाईल पुलाच्या जोडरस्त्यांच्या कामांमुळे एल्फिन्स्टन, लोअर परळ आणि महालक्ष्मी परिसरातील वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे. या कामांसाठी पालिका ८८४ कोटींचा खर्च करणार आहे. या पुलांच्या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, राहुल शेवाळे, आमदार यामिनी जाधव, अजय चौधरी, प्रकाश फातर्पेकर, मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री अस्लम शेख, मिलींद नार्वेकर, विनायक मेटे, सुनील शिंदे, सचिन आहीर, दगडू सकपाळ, नगरसेविका श्रद्धा जाधव, हेमांगी वरळीकर, स्नेहल आंबेकर, नगरसेवक अशीष चेंबूरकर, अरविंद भोसले, रमाकांत रहाटे, तृष्णा विश्वासराव, वैशाली शेवाळे, पालिका आयुक्त प्रवीण परदेशी अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जर्हाड, विजय सिंघल, यांच्यासह नगरसेवक, पालिका अधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
‘मियावाकी’मुळे मुंबईतील प्रदूषण कमी होणार
वडाळा भक्ती पार्क येथे पालिकेच्या संकल्पनेतील जापनीज पद्धतीच्या मियावाकी गार्डन प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला. या महत्त्वाकांक्षी वनीकरण मोहिमेत मुंबईत 64 प्लॉटची निवड करण्यात आली असून या जागांवर 3 लाख 77 हजार झाडे लावण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे ‘मियावाकी वन’ पद्धतीत सामान्य वृक्ष लागवडीपेक्षा 30 पट जास्त झाडांची लागवड करता येणार असून अवघ्या तीन वर्षांत ही वने ‘मेंटेनन्स-फ्री’ होणार आहेत. अशा प्रकल्पांमुळे मुंबईतील प्रदूषण कमी होईल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. ‘बीकेसी’तील प्रदूषण दिल्लीपेक्षा वाढल्याचे वृत्त आहे. त्यामुळे मुंबईत झाडे आवड म्हणून नव्हे, तर गरज म्हणून लावावी लागतील असेही त्यांनी सांगितले. वडाळ्यात ‘मियावकी’साठी निवडलेली ‘भक्ती पार्क’ ही जागा योग्यच असल्याचे सांगताना ‘भक्ती असेल, तिथे यश नक्की मिळते’ असेही ते म्हणाले.
राणी बागेत देशातील पहिलेच पक्षी विहार
पालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील देशातील पहिल्याच भव्य ‘मुक्त पक्षी विहारा’चे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. मुक्त पक्षी विहार दालन हे 44 फूट उंच आणि 18 हजार 234 चौरस फूट क्षेत्रफळात तयार करण्यात आले आहे. यामध्ये बजरीगर, क्रौंच, हॅरॉननाईट, पेलीकन, करकोचा (स्टॉर्क), सारस, मकाव यासारख्या विविध 100 पक्ष्यांचा समावेश आहे. या ठिकाणी पक्षांसाठी झाडांवर विशिष्ट व्यवस्थेबरोबरच पक्ष्यांचा घरट्यांचीही काळजी घेण्यात आली आहे. याच विहारामध्ये 16 फूट उंचीवरून वाहणारा नयनरम्य धबधबा आणि मनोहारी ओहोळदेखील आहे. या ठिकाणचा 96 मीटर लांबीचा पादचारी पुलावरून विहारात पर्यटकांना फिरता येणार आहे. ज्यामुळे पक्षी जवळून पाहता येतील.
बिबट्या, अस्वल, तरस, कोल्हा, कासव
राणीबागेत नव्याने आणलेल्या बिबट्या, अस्वल, तरस, कोल्हा आणि कासव यांच्यासाठी बनवण्यात आलेल्या दालनांचे लोकार्पणदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या ठिकाणी प्राण्यांसाठी बनवण्यात आलेल्या दालनांमध्येही नैसर्गिक अधिवासाप्रमाणे व्यवस्था करण्यात आली आहे. दालनामध्ये असणार्या प्राण्यांची ठळक वैशिष्ट्ये सांगणारे सचित्र माहिती फलक दालनाजवळ बसविण्यात आले आहेत. या ठिकाणी पाण्यातील कासव अर्थात ‘टर्टल’ व जमिनीवरील कासव अर्थात ‘टॉरटॉईज’ यांच्यासाठीही दालन बनवण्यात आले आहे. विशेष म्हणजे नैसर्गिक अधिवासाप्रमाणे असणार्या दालनात ठेवलेले पक्षी जवळून न्याहाळता यावेत यासाठी विशिष्ट प्रकारच काच बसवण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांना प्राण्यांबरोबर सेल्फीही घेता येणार आहे.



























































