परराज्यातील मजुरांसाठी विशेष ट्रेन सोडा, मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे पुन्हा मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रात अडकलेल्या परराज्यातील सहा लाख स्थलांतरित कामगार व मजुरांची जेवणाची व्यवस्था राज्य सरकारने केली. हे कामगार घरी जाण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यातून काही वेळा आंदोलनाच्या पवित्र्यात येतात. ३० एप्रिलनंतर १५ मेपर्यंत कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याचा अंदाज केंद्र सरकारने व्यक्त केला असेल तर सध्याचा हातात असलेला कालावधी लक्षात घेऊन या मजुरांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्यासाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करता येईल का याचा केंद्र सरकारने विचार करावा, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंगळवारी केंद्रीय पथकासमोर केला.

अतिरिक्त केंद्रीय सचिव मनोज जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांचे केंद्रीय पथक महाराष्ट्रात आले आहे मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या  माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्यसचिव अजोय मेहता, केद्रीय पथकाचे सदस्य,बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रविण परदेशी आणि मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग सहभागी झाले होते.

एप्रिल अखेरपर्यंत गाईडलाईन
परराज्यातील अडकलेल्या या कामगार आणि मजुरांना त्यांच्या मुळगावी पाठविण्यासाठी स्पेशल ट्रेनची व्यवस्था करता येईल का याचा विचार केंद्र शासनाने करावा, एप्रिल अखेरपर्यंत यासंदर्भातील गाईडलाईन निर्गमित करावी, अशी मागणी आपण प्रधानमंत्री तसेच रेल्वेमंत्रालयाकडे केली असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला.

वरळी कोळीवाड्याला भेट
केंद्रीय पथकाने वरळीकोळीवाड्याला आज भेट दिली.आपल्या पहाणीतील निष्कर्ष आज त्यांनीमुख्यमंत्र्यासमोर मांडले. यात प्रामुख्याने डोअर टु डोअर सव्र्हवर भर दिला जावा, हे काम करणाऱ्या स्वंयसेवकांची संख्या वाढविण्यात यावी अशी सूचना या पथकाने केली.

वरळीतील कोरोनामुक्तीचे कौतुक
वरळी कोळीवाडा हे देशातील कोरोनामुक्तीचे एक उत्तम उदाहरण होऊ शकते असे सांगून केंद्रीय सचिव जोशी यांनी महाराष्ट्राच्या कोरोना बाधितांचा कालावधी दुप्पट होण्याच्या दिवसांमध्ये वाढ झाल्याचे सांगितले. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील काही चांगल्या गोष्टींचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल. महाराष्ट्राचा डबलिंक रेट ६.३ आहे तर मुंबईचा ४.३. वरळी कोळीवाड्याप्रमाणे इतर कंटेंनमेंट झोनमध्ये काम झाल्यास विषाणुची साखळी तोडण्यास मदत होईल असे ते म्हणले.

८० टक्के रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत
राज्यातील ८० टक्के रुग्णांमध्ये कोरानाची लक्षणेच दिसत नाहीत यामागचे कारण काय असावे, जगभरातील स्थिती काय आहे, महाराष्ट्रात ज्या दुबई आणि अमेरिकेतून विषाणुचा प्रवेश झाला त्या अमेरिकेची स्थिती माहित आहे पण दुबईमध्ये कोणत्या उपाययोजना करण्यात येत आहेत , ते कुठे बरोबर आहेत आणि कुठे चुकले आहेत याचा अभ्यास करण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली