शिवछत्रपतींच्या मार्गावरच हा महाराष्ट्र पुढे जाईल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामान्य रयतेच्या कल्याणासाठी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. दीन, दलित, आदिवासी, शोषित, शेतकरी, शेतमजूर, महिलांच्या कल्याणाची प्रेरणा शिवछत्रपतींच्या कार्यातूनच आम्हाला मिळाली असून त्यांनी दाखविलेल्या मार्गानेच महाराष्ट्राचा कारभार चालेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

जुन्नर येथील किल्ले शिवनेरी येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेऊन अभिवादन केले. शिवजन्म स्थळी दर्शनाला जाताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवनेरीवरील माती उचलून कपाळी लावली. ‘शिवकुंज’ सभागृहातील राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला, त्यानंतर ते बोलत होते. यावेळी सौ. रश्मी ठाकरे, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे, आमदार अतुल बेनके, माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईच्या बाहेर प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे आलो आहे. या शिवजन्मभूमीत राजमाता जिजाऊ आणि शिवछत्रपती यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांना अपेक्षित असणारे रयतेचे राज्य आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सामान्य रयतेला दिलासा देणारे, त्यांना न्याय देणारे कामच या ठिकाणी केले जाणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

हा शिवरायांचा आशीर्वाद!
मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये मी येथे आलो. येथील पवित्र माती घेऊन मी आयोध्येला गेलो. त्यानंतर अयोध्येचा निकाल चांगला लागला आणि काही दिवसांतच मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी माझ्यावर अनपेक्षितपणे आली. याचा अर्थ असा की, छत्रपती शिवरायांचा व जिजाऊंचा हा आशीर्वाद आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

एकवीरा आईचा आशीर्वाद
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सहकुटुंब एककीरा आईचे दर्शन घेत महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी साकडे घातले. श्रीक्षेत्र कार्ला गडावर गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टरने आगमन झाले. सौ. रश्मी ठाकरे, शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे त्यांच्या सोबत होते. हेलीपॅड ते मंदिर दरम्यान त्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. कोळी गाण्यांच्या ठेक्यावर बँड पथकाने ताल धरला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एकवीरा आईचे अगदी मनोभावे दर्शन घेत आरती केली. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते एकवीरा आईची खणानारळाने ओटी भरण्यात आली. एकवीरा देवस्थानच्या वतीने उद्धव ठाकरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे, बबन पाटील आदी उपस्थित होते.