आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना लवकरच योग्य मोबदला मिळणार

राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक हे आरोग्य विभागाचा कणा आहे. कोरोना विरोधातील लढय़ात त्यांची भूमिका मोलाची आहे. त्यांना सरकारने काढलेल्या शासननिर्णयानुसार लवकरच मोबदला मिळणार असून 28 सप्टेंबरपासून प्रस्तावित असलेले कामबंद आंदोलन त्यांनी स्थगित करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केले आहे.

ग्रामीण आणि शहरी भागात मिळून 66 हजारांहून अधिक आशा स्वयंसेविका तर 4 हजार गटप्रवर्तक काम करत आहेत. या आशा स्वयंसेविका तसेच गट प्रवर्तकांनी 28 सप्टेंबरपासून आंदोलन पुकारले आहे. त्यांच्या मोबदल्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, आशा स्वयंसेविकांना आणि गट प्रवर्तकांना प्रकल्प अंमलबजावणी आराखडय़ातील मंजुरीनुसार सेवांवर आधारित मोबदला मिळतो. त्यासोबत आशा स्वयंसेविकांच्या कामाची दखल घेऊन राज्य शासनाने आशा स्वंयसेविकेस दरमहा 2 हजार आणि गट प्रवर्तकांना दरमहा 3 हजार  राज्य शासनाच्या निधीतून मोबदला देण्याचा निर्णय घेतला आहे.

‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ हे अभियान  राबविण्यास सुरुवात झाली आहे.  याकरिता आपणास केंद्र शासनाने दरमहा मंजूर केलेल्या 1 हजार रुपयांव्यतिरिक्त दररोज 150 रुपये इतका मोबदला अदा करण्यात येणार आहे.  तसेच याकामी सोबतीला मदतीसाठी एक स्वयंसेवक देखील उपलब्ध करून देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रात नमूद केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या