नांदेड : डांबर घोटाळ्यात एस.जी. पद्मावारविरूद्ध नवीन गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

सार्वजनिक बांधकाम विभागातील 11 कोटींच्या डांबर घोटाळ्यातील एका आरोपीविरूद्ध एक नवीन गुन्हा शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. या गुन्ह्यात कंत्राटदार एस.जी. पद्मावार यांनी अंदाजे 23 लाख रूपयांची बनावट बिजके बनविल्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा आरोप आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता संदीप अशोकराव कोटलवार यांनी काल दि. 24 मार्च रोजी दिलेल्या तक्रारीनुसार सन 2012-13 दरम्यान रस्ते बांधणी व दुरूस्तीची कामे करताना शासकीय तेल कंपन्याकडून डांबर खरेदी करण्याचा शासन निर्णय असताना त्यांनी इतर ठिकाणाहून त्यांनी डांबर खरेदी केले आणि शासकीय तेल कंपन्याकडून डांबर खरेदी केल्याची खोटी बिले तयार केली. खोटी तयार केलेली बिले खोटी आहेत, हे माहित असताना त्यावर बोधचिन्हे, शिक्के यांचा वापर करून ती बिजके (गेटपास) तयार केले आणि सार्वजनिक बांधकाम विभागात दाखल केले आणि अंदाजे 23 लाख रूपयांची बिजके उचलली आणि शासनाची फसवणुक केली.

या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी भारतीय दंड विधानाची कलमे 420, 409, 464, 465, 466, 468, 471, 472, 473 नुसार गुन्हा दाखल केला असून तपास पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे यांच्याकडे देण्यात आला आहे.

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात 6 कंत्राटदारांविरूद्ध कोटलवार यांच्या तक्रारीवरून असाच एक 11 कोटी रूपयांची खोटी डांबर बिले बनविल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणातील 3 कंत्राटदारांना अटक झाली होती, एका विरूद्ध सार्वजनिक बांधकाम विभागानेच गुन्हा परत घेतला होता आणि एकाला अजून पकडणे शिल्लक आहे. त्या गुन्ह्यात एस.जी. पद्मावार यांचे नाव आरोपी म्हणून होते. पण उच्च न्यायालयाने मागील महिन्यातच त्यांना हृदयशस्त्रक्रिया झाली या कारणावरून अटकपुर्व जामीन मंजुर केला होता.