‘कोस्टल रोड’साठी महाकाय टनेल बोरिंग मशीन बसवण्याच्या कामाला वेग

1937

‘कोस्टल रोड’च्या कामासाठी चीनमधून आणलेली तब्बल 2200 टन वजनाची महाकाय टनेल मशीन मुंबई बंदरातून आता प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी डेरेदाखल झाली आहे. या अत्याधुनिक मशीनच्या सहाय्याने प्रिंन्सेस स्ट्रिट ते वरळी सी-लिंकपर्यंतच्या 9.98 किमीच्या मार्गात असणारा एकूण 3.45 किमीचा बोगदा खोदला जाणार आहे. मात्र, ही महाकाय मशीन बसवण्यासाठीच दोन महिन्यांहून जास्त कालावधी लागणार आहे. दरम्यान, सध्या कोस्टल रोडचे 10 टक्के काम पूर्ण झाले असून डिसेंबर 2022 ची डेडलाइन पाळण्यासाठी वेगाने काम सुरू असल्याची माहिती कोस्टल रोडचे मुख्य अभियंता विजय निघोट यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील आणि मुंबईला वेगवान बनवणार्‍या 13 हजार कोटींच्या ‘कोस्टल रोड’चे काम पालिकेच्या माध्यमातून 13 ऑक्टोबर 2018 रोजी सुरू करण्यात आले. मात्र, काही न्यायालयीन प्रक्रियांमुळे हे काम काही काळ बंद होते. मात्र पालिकेने सर्वोच्च न्यायालयात कोस्टल रोडबाबत यशस्वीरीत्या बाजू मांडली. यामुळे मुंबईत वाढलेली वाहतूककोंडी सोडवण्यासाठी कोस्टल रोड महत्त्वपूर्ण आणि आवश्यक असल्याचे सांगत 17 डिसेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने कोस्टल रोडच्या कामावरील स्थगिती उठवली. त्यामुळे सहा महिन्यांपासून बंद असलेले काम तातडीने सुरू करण्यात आले. 18 डिसेंबर 2019 पासून काम पुन्हा सुरू झाले आहे.

असे होतेय काम

  • कोस्टल रोडच्या कामासाठी चीनमधून आलेली दीडशे कोटी किंमतीची टनेल मशीन 80 मीटर लांब, 2200 टन वजनाची आहे.
  • ही मशीन बसवण्यासाठी 20 मीटर खोल ‘हार्ड रॉक’ खोदावे लागत आहेत. शिवाय मशीन उतरवण्यासाठी ‘80 बाय 40 मीटर’ जागा तयार करावी लागत आहे. या कामात एकूण 90 हजार क्युबिक मीटर खोदकाम करावे लागणार आहे.
  • यातील 50 मीटर क्युबिक मीटर खोदकाम मशीनसाठी करावे लागणार आहे. आतापर्यंत 17 हजार क्युबिक मीटर खोदकाम पूर्ण झाले आहे. यानंतर पाया तयार केल्यानंतर 1 ऑगस्टपासून मशीन उतरवायला सुरुवात केली जाणार आहे.
  • यानंतर मशीनला स्लरी ट्रिटमेंट प्लांट बसवावा लागणार आहे. हा प्लांट चीनमधून सागरी मार्गाने आणाला जात आहे. यानंतर ऑक्टोबरपासून या मशीनच्या सहाय्याने प्रत्यक्ष बोगदा खोदायचे काम सुरू करण्यात येईल.

700 कर्मचारी-अधिकारी ऑनड्युटी
लॉकडाऊन असले तरी अत्यावश्यक सेवेत कोस्टल रोडचे काम येत असल्यामुळे सोशल सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून काम केले जात आहे. सध्या 700 कर्मचारी आणि अधिकारी ऑनड्युटी आहेत. लॉकडाऊनच्या सुरुवातीला कामगारांची संख्या फक्त 300 होती. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामावर येणार्‍या प्रत्येकाची दररोज आवश्यक असणारी आरोग्य चाचणी केली जात आहे. शिवाय निर्जंतुकीकरण आणि कामगारांच्या सुरक्षेची खबरदारी घेतली जात असल्याची माहितीही कोस्टल रोडचे प्रमुख अभियंता विजय निघोट यांनी दिली.

मुंबई होणार सुपरफास्ट
कोस्टल रोडमुळे प्रिंन्सेस स्ट्रिट या मुंबईच्या दक्षिण टोकापासून थेट वांद्र्यापर्यंत मुंबईकरांना टोल-फ्री रस्त्यावरून सुस्साट जाता येणार आहे. यामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार असून वेळ आणि इंधनाची बचत होणार असल्याने मुंबईच्या विकासालाही चालना मिळणार आहे. कोस्टल रोडमुळे वेळेची बचत 70 टक्के होईल, तर प्रतिवर्षी इंधनाची बचत 34 टक्के होईल. शिवाय ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असून मुंबई सुपरफास्ट होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या