जुहूत जाळय़ातून घोणस, बोरिवलीत पिंपातून नागाची सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्यांचा एक दंशही मृत्यूला निमंत्रण देतो असा एक अतिविषारी घोणस आणि एक नाग संकटात सापडला. घोणस जुहू येथे मच्छिमारांच्या जाळ्यात अडकला होता तर एक नाग बोरीवलीत पाण्याच्या पिंपात पडल्याने त्याला बाहेरच येता येत नव्हते. या दोन्ही विषारी सापांची सुटका पशूप्रेमी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केली.

जुहू येथील मोरागाव येथे कोळ्याच्या जाळ्यात सुमारे तीन फूट लांबीचा साप अडकल्याची माहिती अक्षय कुमार मांगेला यांनी अम्मा केअर फाऊंडेशन आणि ‘पॉज’ या पशूप्रेमी संस्थेला दिली. ती मिळताच संस्थेचे कार्यकर्ते सुष्मिता दिघे आणि सुनील गुप्ता तिथे पोहोचले. जाळ्यातील साप हा घोणस असल्याचे त्यांनी पाहिले. त्याची मान आणि जबडा जाळ्यात फसले होते. त्याला जाळ्यातून सोडवून तातडीने पशूचिकित्सकांकडे नेण्यात आले.

बोरीवलीच्या साईबाबा नगरातील एका चाळीत पाण्याच्या पिंपात नाग पडल्याचे रहिवासी गणेश चौधरी यांना आढळले. त्यांनी संपर्क साधल्यानंतर ‘पॉज’चे कार्यकर्ते आकाश पंडय़ा आणि सुनील गुप्ता तिथे पोहोचले. तो नाग दोन फूट लांबीचा होता. त्यालाही पशूचिकित्सकांकडे तपासणीसाठी नेण्यात आले. नंतर या दोन्ही सापांची निसर्गात सुटका करण्यात आली.