गुजरातचा आता उडता गुजरात झाला आहे. गुजरात ड्रग्जचा अड्डा बनला आहे. गुजरातच्या मुद्रा बंदरासह किनारपट्टी भागात हजारो कोटींचे ड्रग्ज पकडण्यात आले. त्यानंतर आता पुन्हा पाच हजार कोटींचे कोकेन जप्त करण्यात आले. गुजरातमधील अंकलेश्वर येथील अवकार ड्रग्ज लिमिटेड कंपनीच्या गोदामातून रविवारी रात्री 518 किलो कोकेन पकडण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे 5 हजार कोटी रुपये आहे. दिल्ली-गुजरात पोलिसांच्या या संयुक्त कारवाईत घटनास्थळावरून 6 जणांना अटक करण्यात आली आहे.
ड्रग्ज सिंडिकेटचा मास्टरमाइंड वीरेंद्र बसोया हा दुबईतून सूत्रे हलवत असल्याचे समोर आले आहे. दुबईत त्याचे अनेक व्यवसाय आहेत. त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. संपूर्ण देशात इतक्या मोठय़ा प्रमाणावर कोकेन कधीच जप्त करण्यात आलेले नाही. गेल्या 12 दिवसांत घातलेले तीन छापे आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे उघड झाले आहे.
सांकेतिक नावाने व्हायची तस्करी
ड्रग्ज रॅकेटमध्ये अनेक तस्कर एकमेकांना नावाने ओळखत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते समन्वय साधत असत. संवादासाठी प्रत्येक तस्कराला सांकेतिक नाव देण्यात आले होते. दिल्ली आणि गुजरातमध्ये आलेली ड्रग्जची खेप दक्षिण अमेरिकेन देशातून सागरी मार्गाने गोव्यात आणण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानंतर ते ड्रग्ज दिल्लीत आणण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
z दिल्ली-गुजरातमधील कोकेन जप्तीचे आतापर्यंतचे हे सर्वात मोठे प्रकरण मानले जात आहे. या सिंडिकेटचा पर्दाफाश करण्यासाठी दिल्ली पोलीस गेल्या दोन महिन्यांपासून काम करत होते. ड्रग्ज पुरवठय़ाबाबत पोलिसांना टीप मिळाली होती. दरम्यान, हे तस्कर दिल्ली आणि एनसीआरमध्ये या अमली पदार्थांची तस्करी करण्याचा प्रयत्न करत होते.
z 10 ऑक्टोबर रोजी गुन्हे शाखेने पश्चिम दिल्लीतील रमेश नगर भागात भाडय़ाच्या दुकानातून 208 किलो कोकेन जप्त केले होते. आंतराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 2,080 कोटी रुपये होती.
z 2 ऑक्टोबर रोजी दिल्ली पोलिसांनी दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथून 560 किलो कोकेन आणि 40 किलो गांजा जप्त केला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे 5620 कोटी रुपये होती.
12 दिवस, तीन छापे, 13 हजार कोटींचे ड्रग्ज
2 ऑक्टोबर आणि 10 ऑक्टोबर रोजी छाप्यांदरम्यान जप्त करण्यात आलेल्या सिंडिकेटशीच गुजरातमध्ये जप्त करण्यात आलेल्या कोकेनचा संबंध असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. या सिंडिकेटमधून आतापर्यंत 1289 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले असून त्याची किंमत 13 हजार कोटी रुपये आहे. या सिंडिकेटशी संबंधित एकूण 12 जणांना अटक करण्यात आली आहे.