आईस्क्रीममध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडल्याची घटना ताजी असतानाच कॉफीमध्ये झुरळ सापडल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मालाड पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
तक्रारदार हे मालाड येथे राहतात. शुक्रवारी ते त्याच्या मित्रांसोबत मालाड येथील एका कॉफी शॉपमध्ये गेले होते. त्यांनी कॉफीची ऑर्डर दिली. काही वेळाने वेटरने कॉफी त्यांच्या टेबलवर आणून ठेवली.
तक्रारदार यांनी कॉफी टेस्ट केली. कॉफी कडवट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तक्रारदार याने याची माहिती वेटरला दिली. कॉफी कडू असल्याने त्याने वेटरला सांगून त्यात स्वीट टाकण्यास सांगितले. स्वीट टाकण्यासाठी वेटरने ग्लास घेऊन तो पुढे गेला.
त्यानंतर त्याने स्वीट टाकून तो पुन्हा तक्रारदार यांच्याजवळ आला. तक्रारदार हे स्ट्रॉने कॉफी पीत असताना त्यांना ग्लासामध्ये काही शिल्लक राहिल्याचे दिसले. त्याने बारकाईने पहिले असता ते झुरळ असल्याचे समोर आले. तक्रारदार याने वेटरला बोलावून याची माहिती दिली. त्याने त्या ग्लासात असलेल्या झुरळाचा फोटो काढला.
काही वेळाने त्या हॉटेलचे मालक तक्रारदार याच्या जवळ आले. त्याने तक्रारदार यांना किचनमध्ये नेले. तेथे नेऊन जेथे कॉफी बनवली ते दाखवले. या घटनेनंतर त्याने मालाड पोलीस ठाण्यात धाव घेतली. मालाड पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.