कुलाबा-सीप्झ मेट्रोच्या भुयारीकरणाचा 31वा टप्पा पूर्ण

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-3 मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (सीएसआयए) टर्मिनल-1 स्थानक येथे भुयारीकरणाचा 31 वा टप्पा पूर्ण झाला. तापी-1 या टनेल बोअरिंग मशिनद्वारे सहार ते विमानतळ टर्मिनल-1 पर्यंत दीड किलोमीटरचे भुयारीकरण 449 दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आले. त्यासाठी 1080 सिमेंट रिंग्सचा वापर करण्यात आला.

सीएसआयए टर्मिनल-1 हे कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्गावरील एक महत्वाचे स्थानक आहे. रोज एक लाखांपेक्षा जास्त प्रवासी या स्थानकातून प्रवास करतील असा अंदाज आहे. हे स्थानक आंतरराष्ट्रीय आणि आंतर्देशीय विमानतळांना जोडले जाणार आहे. त्यामुळे विमानतळ परिसरातील वाहतुकीची कोंडीही दूर होण्यास मदत होईल असे मुंबई मेट्रो रेल महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल म्हणाले.

भुयारी मेट्रोच्या पॅकेज-६ मध्ये सीएसआयए टर्मिनल-1, सीएसआयए टर्मिनल-2 आणि सहार रोड या स्थानकांचा समावेश आहे. या पॅकेजमधील 85 टक्के भुयारीकरण पूर्ण झाले आहे. सध्या सात टीबीएम मशिनच्या सहाय्याने विविध भागांमध्ये भुयारीकरण सुरू आहे. येत्या काही महिन्यांमध्ये भुयारीकरणाचे आणखी टप्पे पूर्ण होतील असा महामंडळाला विश्वास आहे.

आपली प्रतिक्रिया द्या