
उत्तर हिंदुस्थानातील बर्फवृष्टीने मुंबईला चांगलीच हुडहुडी भरली आहे. तापमानाने दहा वर्षांचा रेकॉर्ड मोडला असून शहराचा पारा 13.2 अंशांवर खाली आला आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईत ‘मन हुडूहुडू झालं’चे फिलिंग तसेच सुखद गारवा पसरला आहे. तापमानाच्या किमान व कमाल अशा दोन्ही पातळीत घट झाल्यामुळे दिवसरात्र गारठा आहे. थंडीचा हा कडाका आणखी वाढणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.
नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात गायब झालेली थंडी नवीन वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा सक्रीय झाली. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तापमान उतरणीला लागले. त्यात शनिवारपासून मोठी घट होऊन सोमवारी दहा वर्षांतील निच्चांकी 13.2 अंश तापमानाची नोंद झाली. रविवारी 18 अंश इतके किमान तापमान होते. त्यात सोमवारी जवळपास 5 अंशांची घट झाली, तर कमाल तापमान तब्बल 6 अंशांनी खाली आले. हवामान विभागाकडील नोंदीनुसार, सोमवारी सांताक्रूझमध्ये कमाल 25.1 (6.1 अंशांनी कमी) आणि किमान 13.2 अंश (4.3 अंशांनी कमी) तापमान नोंद झाले. याचवेळी कुलाब्यात कमाल 25.7 आणि किमान 15.2 अंश (दोन्ही पातळीत 5 अंशांची घट) तापमान नोंदवले गेले. शहर आणि उपनगरांचा पारा मंगळवारी आणखी खाली जाईल आणि 11 ते 12 अंशांच्या किमान तापमानाची नोंद होईल, असे भाकीत हवामान खात्याने केले आहे.
वायव्य हिंदुस्थानवरील पश्चिमी विक्षोभाचे (वेस्टर्न डिस्टर्बन्स) चक्रीवादळ अरबी समुद्रातील आर्द्रता खेचत आहे. त्याचबरोबर उत्तरेकडील थंड वारे मुंबई-महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत. या वाऱ्यांनी मुंबई-महाराष्ट्रातील थंडीचा कडाका वाढवला आहे.
उर्वरित महाराष्ट्रातही थंडीची लाट आहे. सोमवारी नाशिकमध्ये 7.3, पुणे- 12, ठाणे- 18, माथेरान- 10.6, महाबळेश्वर- 10, सोलापूर- 16.7, रत्नागिरी- 19, डहाणू- 15, बारामती- 13.8, जालना- 12, सातारा- 15 असे किमान तापमान नोंद झाले.
सांताक्रूझमध्ये नोंद झालेले 13.2 अंश तापमान हे दहा वर्षांतील जानेवारी महिन्यातील सर्वात कमी तापमान आहे. गेल्या वर्षीच्या जानेवारीत पारा 14.2 अंशांकर खाली आला होता. मुंबईत यापूर्वी 22 जानेवारी 1962 रोजी 7.4 अंशांचा ‘ऑलटाईम रेकॉर्ड’ नोंद झालेला आहे.
– नीता शशीधरन, शास्त्रज्ञ, हवामान विभाग






























































