
सामना प्रतिनिधी, पुणे
राज्यात थंडीचा कडाका कायम असून मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ात दहा अंश सेल्सियसच्या खाली आहे. येत्या 24 तासांत राज्यात हुडहुडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पुण्यात आज नीचांकी सहा अंश सेल्सियस किमान तापमान होते. नागपूरमध्ये राज्यात सर्वात कमी पारा 4 अंशापर्यंत घसरला होता. मुंबईतही थंडीचा प्रभाव दिसून आला.
मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत थंडीची लाट असून येत्या 24 तासांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्ष स्वागतासाठी 31 डिसेंबरची रात्रदेखील यंदा कुडकुडत काढावी लागणार आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये थंडीचा कडाका कायम राहणार आहे.
द्राक्षावर परिणाम होण्याची शक्यता
थंडीचा कडाका असाच कायम राहिल्यास त्याचा विपरीत परिणाम द्राक्ष पिकावर होऊन द्राक्षाचे मणी फुटू नयेत म्हणून द्राक्षबागांना कडेने आच्छादन लावण्यात आले आहे. अनेक ठिकाणी पिकांमध्ये तापमान संतुलित राहावे यासाठी विजेचे दिवे लावून खबरदारी घेण्यात आली आहे.
पुण्यात नीचांकी तापमान असल्याने आणि गेल्या दहा-बारा वर्षांत सर्वाधिक कडकडीत थंडी पडल्याने पुणेकर या थंडीचा आनंद घेत आहेत. गुलाबी थंडीत सकाळी व्यायामासाठी बाहेर पडणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. पुणेकर स्वेटर, मफलर गुंडाळून भल्यापहाटे रस्त्यावर थंडीत बाहेर पडताहेत. दिवसभर गारठा कायम असल्याने वाफाळलेला चहा घेण्यासाठी शहरातील अमृतुल्य हाऊसफुल्ल दिसून येतात. लोकांबरोबरच बाप्पालाही थंडी भरली असून सारसबागेतील तळ्यातल्या गणपतीला थंडीपासून बचावासाठी स्वेटर आणि शाल घालण्यात आली आहे.
रब्बी पिकांना ही थंडी पोषक ठरणार आहे. बटाटा, कांदा आणि फळवर्गीय पिकांना या थंडीचा फायदा होणार आहे. याशिवाय ज्वारी, गहू, हरभरा या पिकांच्या वाढीसाठी हवामान पोषक आहे. सध्या रब्बी पिके वाढीच्या स्थितीमध्ये असून काही ठिकाणी गहू आणि हरभऱयाच्या पेरण्या सुरू आहेत.
राज्यातल्या प्रमुख शहरांतील किमान तापमान अंश सेल्सियसमध्ये याप्रमाणे – नगर 4.5 , जळगाव 6.6, मालेगाव, नाशिक 7, सातारा 9.4, धाराशीव 8.2, संभाजीनगर 6.8, परभणी-नांदेड 7, अकोला 5.9, अमरावती 8.4, बुलढाणा 7.5 , चंद्रपूर 8.2, गोंदिया-वर्धा 7.5, महाबळेश्वरमध्ये 7 अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली. थंडीचा कडाका 2 ते 3 जानेवारीपर्यंत कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे .



























































