
उत्तर हिंदुस्थानातून आलेल्या थंड वाऱयांमुळे महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे. राज्यात धुळे, नाशिक, परभणी, सोलापूर या चार जिल्ह्यांमध्ये थंडीची तीव्र लाट धडकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. चारही जिल्ह्यांतील किमान तापमानाचा पारा 5 ते 6 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरेल. ‘ला निना’च्या प्रभावामुळे जानेवारीपर्यंत थंडीची ही तीव्रता कायम राहील, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
गेल्या आठवडय़ापासून मुंबई-ठाण्यासह उर्वरित राज्यात थंडीची तीव्रता वाढली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत सोमवारी सलग पाचव्या दिवशी किमान तापमान सरासरीपेक्षा कमी नोंद झाले. सांताक्रूझमध्ये 16 अंश किमान तापमान नोंदवले गेले. याचदरम्यान राज्याच्या ग्रामीण भागात थंडीचा कडाका आणखी वाढला आहे. काही जिल्ह्यांमध्ये हाडे गोठवणारी थंडी पडली आहे. धुळे, जेऊर, निफाड, परभणी, पुणे, नाशिक, अहिल्यानगर आणि सातारा या भागांमध्ये कडाक्याची थंडी जाणवत आहे.
– महाबळेश्वरचे किमान तापमान 10 अंशांच्या आसपास आहे. तेथील गारठय़ाचा परिणाम पुणे परिसरात जाणवत असून पुणे शहरात थंडीचा जोर वाढला आहे. पुण्यातील तापमानात सातत्याने घट होत असल्याने नागरिक कुडकुडले आहेत. राज्यात धुळे, नाशिक, परभणी, सोलापूर या चार जिल्ह्यांमध्ये थंडीची तीव्र लाट धडकणार असल्याचा अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात थंडीचा जोर कमी होऊन किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.































































