थंडी मुक्कामी… मुंबईकरांना हुडहुडी! आणखी आठवडाभर पारा 20 अंशांच्या खाली राहणार

मुंबईत रविवारी सलग चौथ्या दिवशी तापमानात मोठी घट झाली. सांताक्रूझ येथे 17.2 अंश, तर कुलाब्यात 20 अंश तापमानाची नोंद झाली. थंडी मुक्कामी राहिल्याने मुंबईकरांनी सुट्टीच्या दिवशी आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेतला. मुंबईत माथेरानइतकेच तापमान नोंद होत आहे. पुढील आठवडाभर शहराचा पारा 20 अंशांच्या खाली राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे

गेल्या आठवडय़ात यंदाच्या हंगामातील निच्चांकी 14 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यानंतरही तापमान 15 ते 17 अंशांच्या आसपास राहिले. थंडीची तीव्रता रविवारी कायम राहिल्याने मुंबईकर सुट्टीच्या दिवशी चांगलेच सुखावले. उत्तरेकडून आलेल्या थंड वाऱयांचा मुंबईसह उर्वरित महाराष्ट्राच्या वातावरणावर परिणाम झाला आहे. अनेक भागांत किमान तापमानात घट झाली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांसह शेजारील ठाणे, पालघर, रायगड परिसरात थंडीची तीव्रता वाढली आहे. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, रविवारी डहाणूमध्ये 16.6 अंश, माथेरानमध्ये 17 अंश, ठाण्यात 19.2 अंश तापमान नोंदवले गेले. संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रातील हवेत गारवा निर्माण झाला आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत हवेत गारवा अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे आरे कॉलनी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये ‘मार्ंनग वॉकर्स’ची संख्या वाढली आहे.

7 जिह्यांत थंडीची लाट

राज्याच्या ग्रामीण भागात थंडीचा कडाका वाढला आहे. मध्य महाराष्ट्रातील सात जिह्यांमध्ये थंडीची लाट येण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यात धुळे, नाशिक, जळगाव, नंदुरबार, अहिल्यानगर, पुणे आणि सोलापूर या जिह्यांचा समावेश आहे. रविवारी जळगावमध्ये 10 अंश, पुणे – 9.4 अंश, अहिल्यानगर – 8.4 अंश, सोलापूर-13.9 अंश, नाशिक – 9.9 अंश, नंदुरबार – 13.5 अशी किमान तापमानाची नोंद झाली.

थंडीबरोबरच धुके आणि प्रदूषण 

रविवारी मुंबईत थंडीबरोबर हवेतील प्रदूषण वाढले. सकाळी एकीकडे धुक्याची चादर पसरली होती आणि त्यात धुलीकणाच्या अधिक प्रमाणामुळे प्रदूषणाची तीव्रता वाढली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदीनुसार, वांद्रे रिक्लेमेशन परिसरात हवेचा गुणवत्ता निर्देशांक 154 अंकांवर नोंदवला गेला.