मुंबईकरांना थंडी झोंबली,पारा 14 डिग्री सेल्सियस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबईसह राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. मुंबईकरांना थंडी चांगलीच झोंबली असून नवीन वर्षाची सुरुवातच कमालीच्या गारठय़ाने झाली आहे. आज मुंबईचा पारा 14.8 डिग्रीपर्यंत खाली घसरला. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला रात्रीच्या गर्दीत स्वेटर, कानटोप्या घातलेलेच मुंबईकर मोठय़ा संख्येने दिसत होते. उत्तरेकडील थंड वाऱयाच्या प्रभावामुळे राज्यात थंडीचा कडाका वाढला असून काही भागांतील थंडीच्या लाटेमुळे किमान तापमानात चांगलीच घट झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

विदर्भात येणार थंडीची लाट
राज्यात कोरडे हवामान असल्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात थंडीची तुरळक लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यातील बहुतांश भागांत मागील पाच ते सहा दिवसांपासून थंडीची चांगली लाट आली आहे. राज्यातील थंडीच्या लाटेमुळे अनेक ठिकाणी सकाळी पिकांवर पडलेले दवबिंदूही गोठले आहेत. ऊब मिळविण्यासाठी मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी शेकोटय़ा पेटत आहेत. या थंडीचा पिकांवरही परिणाम झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

राज्यातले किमान तापमान सहा डिग्रीपर्यंत घसरले
मंगळवारी थंडीच्या लाटेमुळे राज्यातला किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत सहा अंशांपर्यंत खाली आला आहे. विदर्भातील नागपूर येथील पारा सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक आठ अंशांपर्यंत खाली आला आहे. मंगळवारी नगर येथे नीचांकी 4.6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.