
सामना प्रतिनिधी । धुळे
तापमानाचा पारा सहा अंशापर्यंत घसरल्याने शहर गारठले आहे. वाढलेल्या थंडीने साऱ्यांनाच हुडहुडी भरली आहे. अशा परिस्थितीत अनेकांकडून गरम कपड्यांची खरेदी होत आहे. दिवसभर हवेत गारठा असतो. शिवाय काही वेळा वारा वाहतो. तापमानात घट असल्याने सर्वत्र गारठा पसरला आहे. साहजिकच या गारठ्याने जनजीवनावर परिणाम केला आहे. गारठ्यामुळे दिनचर्या उशिरा सुरू होऊन रात्री लवकर संपते. त्यामुळे सर्वच व्यवहारांची गती मंदावली आहे. त्याच वेळी अनेक जण शेकोट्या पेटवून थंडीपासून स्वतःची सुटका करवून घेत आहेत.
धुळे शहर गेल्या काही दिवसांपासून थंडीने गारठले आहे. दिवसागणिक तापमानाचा पारा घसरत आहे. धुळे शहरातील तापमानाची नोंद 5 अंश सेल्सिअस घेण्यात आली. राज्यातील सर्वात कमी तापमान असणारे शहर म्हणून धुळ्याची नोंद झाली. त्यानंतर तापमानात काहीशी वाढ होत आहे. परंतु सरासरी किमान तापमानाची नोंद 6 अंश सेल्सिअस आहे. घसरलेल्या तापमानामुळे शहराला हुडहूडी भरली आहे. अनेकांची दिनचर्या सकाळी उशिरा सुरू होते आणि रात्री लवकर संपुष्टात येते.
झोंबणाऱ्या गार वाऱ्यापासून संरक्षण व्हावे म्हणून सद्या गरम कपड्यांना पर्याय नाही. धुळे शहरात बसलेल्या तिबेटीयन विक्रेत्यांकडे गरम कपडे खरेदी करण्यासाठी आता गर्दी उसळू लागली आहे. उत्तर प्रदेशातील विक्रेते जॅकेट घेऊन धुळे शहरात आले आहेत. आमच्याकडील मोदी जॅकेटला चांगली मागणी आहे. सरासरी 200 रूपयांना आम्ही मोदी जॅकेट विकतो, असे विक्रेत्यांनी सांगितले.
गेल्या पंधरा दिवसांपासून दिवसागणिक थंडीत वाढ होत आहे. सध्या शहराच्या तापमानाचा पारा 6 अंशापर्यंत घसरला आहे. तापमान कमी झाल्यामुळे शहरालाच हुडहुडी भरली आहे. अनेकांकडून गरम कपड्यांची खरेदी होत आहे. शहरातील शिवाजी हायस्कुल शेजारी असलेल्या जागेत तिबेटीयन विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. या विक्रेत्यांकडे टोपी, मफलर, शॉल, हातमोजे, पायमोजे आदी वस्तू विकायला आहेत. शंभर रुपयांपासून अडीच हजार रुपये किमतीची स्वेटर्स तिबेटीयन विक्रेत्यांकडे आहेत. गारठ्याने अनेकांना गरम कपडे घेण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे सायंकाळी तिबेटीयन विक्रेत्यांकडे ग्राहकांची मोठी गर्दी उसळते.
शहराचे तापमान बऱ्याच वर्षांनंतर घटले. रात्री 8 नंतर चौकाचौकांत शाळकरी आणि महाविद्यालयीन मुले शेकोटी पेटवत थंडीपासून दिलासा मिळवत आहेत. जुने धुळे भागापासून जवळच पांझरा नदी वाहते. त्यामुळे या भागात गारठा जरा जास्त असतो. गारठ्यामुळे व्यायामासाठी बाहेर पडणारे आता स्वेटर, मफलरचा आधार घेऊ लागले आहेत. आजवर अनेक वर्षांपासून आम्ही थंडीच्या कालावधीत व्यायामासाठी बाहेर पडतो. पण यंदा पहिल्यांदाच व्यायामासाठी निघताना स्वेटर घालून बाहेर पडावे लागत असल्याचे मल्ल ज्ञानेश्वर फुलपगारे यांनी सांगितले.




























































