
सामना प्रतिनिधी । अलिबाग
मुरूड तालुक्यातील मिठेखार येथे संभाव्य असणाऱ्या दरडग्रस्त भागाची जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांना सावधानता बाळगण्याची सूचना केली आहे. तर दोन दिवसांपूर्वी पुणे येथील भूवैज्ञानिक अधिकारी गजभिये व रॉय यांनी ही या भागाची पाहणी केली आहे.
जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी, मुरूड तहसीलदार परिक्षित पाटील, मुरूड सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शैलेश शिंदे, रेवदंडा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर, मिठेखार ग्राम सरपंच सुवर्णा चवरकर, शरद चवरकर पाहणी दरम्यान उपस्थित होते.
मुरुड तालुक्यातील मिठेखार गावातील डोंगर भागातील दरड कोसळण्याची संभाव्य शक्यता होती. डोंगरातील माती ही पडून खाली वास्तव्य करीत असलेल्या ग्रामस्थांच्या घरात आली होती. त्यामुळे पुढील अनर्थ टाळण्यासाठी येथील 15 कुटूंबाना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. 15 कुटुंबातील सत्तर जणांची राहण्याची, खाण्याची सुविधा जेएसडब्लू कंपनीच्या वसाहतीत केली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज मिठेखार गावातील दरदग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर त्यानी ग्रामस्थांची चौकशी करून चर्चा केली. दरड पडण्याची संभाव्य शक्यता असल्या कारणाने संरक्षक भिंत बांधून द्या व डोंगर भाग सपाट करावा अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. भूवैज्ञानिक याचा अहवाल आल्यानंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल असे यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सावधानता बाळगण्याचा सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी केल्या.




























































