
>> कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)
नोव्हेंबर 2025 च्या पूर्वार्धात पाक सिनेटने मंजूर केलेल्या 27व्या घटना दुरुस्तीवर राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी स्वाक्षरी केल्यानंतर पाकिस्तान एका भीषण वळणावर उभा राहिला आहे. या दुरुस्तीमुळे असीम मुनीर यांनी पाकिस्तानच्या लष्करावरचे नियंत्रण कायदेशीररीत्या स्वतकडे घेतले. सर्व सशस्त्र दलांवर त्यांचे अभूतपूर्व व एकतर्फी अधिकार प्रस्थापित झाले आहेत. हे अधिकार एवढे व्यापक आहेत की, अयुब खान, झिया उल हक आणि परवेझ मुशर्रफलाही ते पाहून हेवा वाटावा. चीनकडून पाठिंबा, अमेरिकेकडून कधी दिसणारे, कधी न दिसणारे संकेत आणि इस्लामी जगतातील प्रतिष्ठा या सर्व गोष्टींचा एकत्रित दाब भारतीय सामरिक संस्थांनी ओळखून सज्ज राहणे अत्यावश्यक आहे.
जगातील कुठल्याही देशात एखाद्या सेनाध्यक्षाने लष्करी उठाव न करता थेट संविधानिक बंड घडवून आणत संपूर्ण सत्ता स्वतकडे खेचून घेतल्याचे उदाहरण दुर्मिळ आहे, परंतु फिल्ड मार्शल असीम मुनीर यांनी हे पहिल्यांदाच पाकिस्तानात घडवून आणले आहे. पाकिस्तानच्या अण्वस्त्र साठय़ाची किल्ली आपल्या ताब्यात ठेवत, देशाच्या नागरी सत्तेला बगल देत उपखंडातील सर्वात धोकादायक आणि सामरिकदृष्टय़ा बलाढय़ व्यक्ती बनण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. भारताविरोधात जन्मजात द्वेष बाळगणाऱ्या आणि हल्ल्यांच्या योजना आखणाऱ्या या व्यक्तीच्या हातात सत्ता गेल्याने संपूर्ण प्रदेश अस्थिरतेच्या उंबरठय़ावर आला आहे.
नोव्हेंबर 2025 च्या पूर्वार्धात पाक सिनेटने मंजूर केलेल्या 27व्या घटना दुरुस्तीवर 14 नोव्हेंबरला राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी स्वाक्षरी केल्यानंतर पाकिस्तान एका भीषण वळणावर उभा राहिला आहे. या दुरुस्तीमुळे असीम मुनीर यांनी पाकिस्तानच्या लष्करावरचे नियंत्रण कायदेशीररीत्या स्वतकडे घेतले. संविधानातील कलम 243 मधील बदलांमुळे सर्व सशस्त्र दलांवर त्यांचे अभूतपूर्व व एकतर्फी अधिकार प्रस्थापित झाले आहेत. असीम मुनीर हे एकाच वेळी अण्वस्त्रांवरील संपूर्ण नियंत्रण ठेवतात, चीनच्या मदतीने भारतावर हल्ल्यांच्या योजना आखतात, देशातील असंतुष्टांना दडपण्यासाठी कठोर कायद्यांचा वापर करतात, पत्रकार अर्शद शरीफ यांच्या हत्येसारख्या कारवायांना छुपा पाठिंबा देतात, टीकाकारांच्या नातेवाईकांचे अपहरण करवतात आणि आपल्या लष्करी कारवायांचे खोटे सामरिक यश पाक जनतेसमोर उभे करून स्वतची प्रतिमा उजळ करतात.
या सर्व प्रक्रियेत भारतीय उपखंडातील शांतता बळी जाते आहे. मुनीर यांना ना जनतेचा पाठिंबा हवा, ना आर्थिक संकटांची पर्वा आहे. त्यांचा एकच उद्देश… राष्ट्रवादाच्या नावाखाली भारताशी नवीन संघर्ष उभा करून स्वतचे राज्य अबाधित ठेवणे. पाकिस्तानात सत्ता टिकवण्याचा हा त्यांचा एकमेव मार्ग असल्याचे सर्वत्र मानले जाते.
आंतरराष्ट्रीय अहवालांतही हे उघड झाले आहे की, फेब्रुवारी 2024च्या सार्वत्रिक निवडणुकांत मोठय़ा प्रमाणात धांधली झाली आणि त्या धांधलीचे सूत्रधार तत्कालीन सेनाध्यक्ष असीम मुनीर होते. घटना तज्ञानुसार, 27वी घटना दुरुस्ती ही बनावट सरकारने केलेली बेकायदेशीर कृती असून तिचा सर्वात धोकादायक भाग म्हणजे लष्करप्रमुखाला नौदल आणि वायुसेनेवरही पूर्ण अधिकार देणे. कोणत्याही सल्लामसलतीशिवाय कोणावरही हल्ला करण्याची क्षमता या दुरुस्तीने सेनाध्यक्षाच्या हातात दिली आहे.
इतिहासात पाकिस्तानात अनेकदा सत्ता उलथापालथ झाली, पण असे कायद्याच्या आडून सत्ता हडपणे पहिल्यांदाच घडले आहे. हे बंडखोरीपेक्षा अधिक प्रणालीबद्ध, व्यवस्थित आणि परिणामकारक आहे. 25 मे 2025 मधील भारत-पाक संघर्षानंतर स्वतला देशरक्षक दाखवण्यासाठी असीम मुनीर यांनी भारताला ‘हैवान’ म्हणत प्रचार केला आणि हा भावनिक उद्वेग वापरून स्वतला फिल्ड मार्शल घोषित करून घेतले.
पाकिस्तानवर नियंत्रण ठेवणाऱ्या, ‘अल्ला, सेना आणि अमेरिका’ या त्रिसूत्रीमधील ‘सेना’ हा घटक आता असीम मुनीरच्या हाती पूर्णत गेला असून पुढील काळात पाकिस्तानमध्ये सामान्य जनतेवर दडपशाही वाढेल, मीडिया पूर्णपणे गप्प बसेल आणि न्यायसंस्था लष्कराच्या छत्राखाली काम करेल. पाकिस्तानमधील नागरी हक्कांचे हनन हे पूर्वीपासूनच गंभीर होते, पण 27व्या घटना दुरुस्तीनंतर ते अनियंत्रित पातळीवर जाईल. बलुचिस्तानमधील लोकांविरोधातील अत्याचार वाढतील, पख्तून समाजावर ‘दहशतवाद्यांना आश्रय’ या नावाखाली कारवाया केल्या जातील आणि जनतेतील विरोधी आवाज ‘राष्ट्रद्रोह’ म्हणून दडपला जाईल. प्रत्यक्षात पाकिस्तानची खरी अवस्था अशी आहे की, त्याची गुप्तचर यंत्रणा, सेनेतील कट्टर धडे आणि जिहादी प्रॉक्सी हेच एक छायाराज्य चालवतात आणि आता त्याच्या शिरोमणीपदी असीम मुनीर बसल्यामुळे या सावलीचे रूप उघड, टोकाचे आणि धोकादायक झाले आहे.
भारतीय उपखंडासाठी ही परिस्थिती प्राणघातक आहे. कारण असीम मुनीरसारखा भाऊगर्दी, अहंकारी आणि कट्टरपंथी सेनाधिकारी जेव्हा सर्व अधिकार आपल्या मुठीत घेतो तेव्हा त्याचे पुढचे पाऊल नेहमीच बाह्य शत्रू निर्माण करण्याचे असते. इतिहास दाखवतो की, पाकिस्तानमधील प्रत्येक हुकूमशहाने भारताला शत्रू म्हणून रंगवून आपली सत्ता बळकट केली आहे. असीम मुनीरही त्याला अपवाद नाही. उलट त्याने भारताविरुद्ध निखळ द्वेष आणि सततची युद्धजन्य भाषा अंगवळणी पाडली आहे. भारतावर हल्ले करवून स्वतला ‘राष्ट्ररक्षक’ म्हणून उभे करणे, चीनकडून आर्थिक आणि सामरिक पाठबळ मिळवणे आणि अमेरिकेला ‘तुमच्या कामासाठी मी तयार आहे’ असा संदेश देणे हा त्याचा एकाच वेळी सर्व कड्या पकडून ठेवण्याचा डाव आहे.
भारतासाठी सर्वात मोठे संकट असे की, असीम मुनीर ‘सीमित युद्ध’ किंवा ‘चार दिवसांचा संघर्ष’ यांसारख्या कल्पनांवर विश्वास ठेवतो. त्याच्या मते भारतावर दडपण आणण्यासाठी किंवा पाकिस्तानातील अराजकतेकडून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी सीमापार छोटेमोठे हल्ले आवश्यक आहेत. हे करताना तो अण्वस्त्रांच्या छायेखाली भारताला धाक दाखवू शकतो. त्याची त्रासदायक, पण गंभीर घोषणा होती, ‘जर आम्ही संपत असू तर आमच्यासोबत जगाचा अर्धा भाग किंवा शेजारील देशही जाईल.’ या वक्तव्याकडे जगाने दुर्लक्ष केले हे अधिकच चिंताजनक आहे.
याशिवाय बांगलादेशातील अस्थिरता, म्यानमारमधील संघर्ष, चीनची घुसखोरी, अफगाणिस्तानातील तणाव आणि अमेरिकेच्या भू-राजकीय खेळी या सर्वांचा फायदा घेण्यासाठी असीम मुनीर सज्ज आहे. बांगलादेशातील शेख हसीनाविरोधातील कट, पूर्वोत्तर भारताला नकाशात दाखवण्याची धिटाई आणि हसीनाला भारताने न सोपविल्यास दिलेली उघड धमकी ही त्या मोठय़ा प्रॉक्सी योजनांचा भाग आहे. असीम मुनीर या घडामोडींना स्वतच्या फायद्यासाठी वापरेल आणि भारताला सामरिकदृष्टय़ा अडचणीत आणण्याचे नवनवीन मार्ग शोधेल.
भारतासाठी या परिस्थितीत सर्वात सूक्ष्म आव्हान असे की, पाकिस्तानकडून केलेल्या हल्ल्यांचे स्पष्ट पुरावे जगासमोर ठेवणे नेहमीच कठीण असते. प्रॉक्सी हल्ल्यांची रचना अशी असते की, मूळ सूत्रधार पकडता येत नाही. अशा वेळी भारताने प्रतिहल्ला केला तर आंतरराष्ट्रीय संस्थांकडून भारतालाच दोष दिला जाऊ शकतो. असीम मुनीर याच ‘पुरावे नसल्याचा फायदा’ घेत भारताला अडचणीत ओढेल. पूर्वोत्तर राज्यांतून, बांगलादेशमार्गे आणि कश्मीरमधून सुरू असलेले जाळे या सर्व गोष्टींसाठी वापरले जाईल.
एकूणच पाहता पाकिस्तानच्या नव्या ‘शहेनशहा’ने आपल्या सत्तेची कास धरून अण्वस्त्रांचे बटण स्वतकडे ठेवले आहे, न्यायसंस्थेला बंधक बनवले आहे, जनतेला दडपले आहे आणि जगाला सततची अस्थिरता दिली आहे. पाकिस्तानमधील भविष्यातील असंतोष, आर्थिक दिवाळखोरी, अफगाण सीमेवरील युद्ध, बलुच-बंडखोरी, बांगलादेशातील उघड संघर्ष यांचे तारे एकत्र येऊन जर फुटले तर पाकिस्तानचे आतून तुकडे होण्याचा धोका मोठा आहे.
या सर्वांचा थेट प्रभाव भारतावर पडणार हे निश्चित. असीम मुनीरसारखा कट्टरपंथी सेनाधिकारी जेव्हा ‘चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस’ म्हणून उदयास येतो तेव्हा त्याचे पहिले लक्ष्य नेहमीच भारत असते. चीनकडून पाठिंबा, अमेरिकेकडून कधी दिसणारे-कधी न दिसणारे संकेत आणि इस्लामी जगतातील प्रतिष्ठा या सर्व गोष्टींचा एकत्रित दाब भारतीय सामरिक संस्थांनी ओळखून सज्ज राहणे अत्यावश्यक आहे.
भारतातील लाल किल्ला परिसरातील आयईडी स्फोट, पहलगाममधील हल्ला, सीमापार घुसखोरी आणि जिहादी प्रॉक्सींचा वापर हे सर्व येणाऱ्या काळात वाढत जाण्याची शक्यता आहे. कारण पाकिस्तानच्या नव्या ‘शहनशहा’ला भारताशी सतत तणाव राखणे हाच सत्तेचा जीवनरस वाटतो आहे. भारतीय नौदलावर हल्ला करण्याचे चिनी-पाकिस्तानी एकत्रित प्लॅन, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर, जॅमिंग क्षमता आणि हिंदी महासागरातील सामरिक दबाव हे भविष्यकाळातील संकेत आहेत. या सर्वांचे उद्दिष्ट एकच, ते म्हणजे असीम मुनीरला कट्टर इस्लामी जगतात ‘सर्वोच्च सेनापती’ म्हणून उभा करणे.
(लेखक सामरिक तज्ञ आहेत)





























































