
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एका ऐतिहासिक आणि अद्भूत क्रांतीची नोंद झाली आहे. टेक्सासमधील एका बायोटेक कंपनीने कवच आणि कोंबडी नसलेल्या, संपूर्णपणे 3 डी-प्रिंटेड कृत्रिम अंड्यांचा वापर करून 26 पिल्लांना यशस्वीरीत्या जन्म दिला आहे. जागतिक विज्ञानाच्या इतिहासात पहिल्यांदाच, संपूर्ण कृत्रिम प्रणालीमध्ये पक्ष्याचा गर्भ पूर्णपणे विकसित करण्यात यश आले आहे. या अभूतपूर्व यशामुळे भविष्यातील संशोधनाचे नवे मार्ग खुले झाले असून ही तर केवळ एक सुरुवात मानली जात आहे.
या क्रांतिकारी तंत्रज्ञानाचा वापर करून ‘कोलोसल बायोसायन्सेस’ (Colossal Biosciences) ही कंपनी ‘साऊथ आयलंड जायंट मोआ’ (South Island Giant Moa) या महाकाय पक्ष्याला पृथ्वीवर पुन्हा परत आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. सुमारे 12 फूट उंच आणि 250 किलो वजनाचा हा भव्य पक्षी 600 वर्षांपूर्वीच पृथ्वीवरून नामशेष झाला होता. सध्या संपूर्ण जगभरात असा कोणताही मोठा पर्यायी जीव किंवा पक्षी अस्तित्वात नाही, जो या महाकाय मोआ पक्ष्याच्या गर्भाला जन्म देऊ शकेल. याच कारणामुळे शास्त्रज्ञांनी कोणत्याही नैसर्गिक पर्यायी जीवाचा वापर न करता, संपूर्णपणे कृत्रिम तंत्रज्ञानाच्या आधारावर ही प्रणाली विकसित केली आहे. या यशस्वी प्रयोगामुळे आता नामशेष झालेल्या प्रजातींना पुन्हा जिवंत करण्याचे स्वप्न पूर्णपणे सत्य झाले आहे. दुसरीकडे, विज्ञानाची ही झेप जगभरात कौतुकाचा विषय ठरत आहे.

























































