
आपण घराची सजावट करायला घेतो तेव्हा सगळ्यात आधी आपल्या मनात येतं ते म्हणजे घरातल्या वेगवेगळ्या खोल्यांसाठी रंग निवडणे. जुन्या घरात थोडा बदल हवा असेल तर आपण सामानाची हलवाहलवी करतो आणि शक्य असेल तर हॉलला किंवा बेडरूमला नवा रंग देतो. अशा वेळेला योग्य रंगसंगती निवडताना थोडा गोंधळ उडतो.
केवळ आपल्याला एखादा रंग खूप आवडतो म्हणून आपण तो खोलीला देऊ शकत नाही. घराच्या बाबतीत रंगांची निवड करताना बऱ्याच बाबींचा विचार करावा लागतो. उदाहरणार्थ खोलीतला प्रकाश, खोली लहान आहे की मोठी, बेडरुमला कोणता रंग द्यायचा, हॉलसाठी कुठले रंग निवडायचे, घरात लहान मुले असतील तर त्यांच्यासाठी कुठला रंग ठरवायचा इत्यादी! ह्याशिवाय एक महत्वाची गोष्ट देखील आपल्याला लक्षात ठेवावी लागते. ती म्हणजे वेगवेगळे रंग वेगवेगळ्या प्रकारचा मूड सेट करतात. घरात वेगवेगळ्या खोल्या विविध प्रकारे आपण वापरतो.प्रत्येक खोलीचा एक वेगळा मूड असतो हे लक्षात घेऊनच आपल्याला रंगांची निवड करायची असते.
रंगांचा आपल्यावर काय परिणाम होतो?
खोलीचा रंग आपल्या मनःस्थितीवर आणि आपल्या विचारांवर परिणाम करू शकतो. तुम्हाला उबदार किंवा थंड वाटणे हे तुमच्या खोलीच्या कलर टोनवर अवलंबून असू शकते. उबदार रंगात रंगवलेली खोली आपल्याला कूल टोन्स असलेल्या खोलीपेक्षा जास्त उबदार वाटते. अर्थात हे आपल्याला केवळ मनाचे खेळ असले तरीही आपल्या दैनंदिन आयुष्यात रंग फार मोठी भूमिका बजावतात. रंगांचा केवळ आपल्या मानसिक आणि भावनिक अवस्थेवरच नव्हे तर आपल्या शरीरावरही परिणाम होतो.
धोका आणि हिंसा दर्शवणारा लाल रंग शारीरिक सतर्कता वाढवण्यासाठी ओळखला जातो. लाल रंग आपल्या मज्जासंस्थेला सक्रिय करतो आणि आपली हृदयगती वाढवतो तसेच आपल्या रक्तप्रवाहात ऍड्रिनॅलीनचे प्रमाण वाढवतो. म्हणूनच बेडरूमच्या भिंती कधीही लाल रंगाच्या असू नयेत. लाल रंग रोमान्सचा असला आणि रोमँटिक वातावरण असावे असे कितीही वाटले तरीही बेडरूमच्या भिंती लाल रंगांच्या असू नयेत. कारण बेडरूममध्ये आपण रिलॅक्स होऊन शांत झोपण्यासाठी जातो. लाल रंग आपल्याला रिलॅक्स होण्यात अडथळा आणू शकतो. तुम्हाला जर लाल रंग फारच आवडत असेल आणि घरात कुठेतरी वापरायचाच असेल तर तो डायनिंग रूमला किंवा लिविंग रूम/ हॉलला देऊ शकता. कारण लाल रंगामुळे खोलीची एनर्जी लेव्हल वाढते.
कुठला रंग कुठल्या खोलीला द्यावा?
नारंगी(ऑरेंज) रंगामुळे मनात उत्साहाची भावना निर्माण होते. त्यामुळे लहान मुलांच्या खेळण्याच्या खोलीला किंवा व्यायामाच्या खोलीला तुम्ही ऑरेंज रंग देऊ शकता. पिवळा रंग आनंदाचे प्रतीक असल्याने तो रंग तुम्ही लिविंग रूमसाठी किंवा बाथरूम, किचनसाठी निवडू शकता.
बेडरूममध्ये आपल्याला आराम करायचा असतो, रिलॅक्स व्हायचे असते. त्यामुळे ही खोली तुम्हाला शांत आणि आरामशीर वातावरण देऊ शकेल अशीच असायला हवी. तसेच जेवणाच्या खोलीत तुम्हाला अधिक चैतन्यशील आणि खेळीमेळीचे वातावरण अपेक्षित आहे जिथे सगळे कुटुंब एकत्र बसून गप्पागोष्टी करत जेवू शकेल. खोलीचे रंग हे असे विविध मूड सेट करण्यात खूप महत्वाची भूमिका बजावतात. म्हणूनच त्या त्या खोलीला अनुसरूनच आपण योग्य रंगांची निवड केली पाहिजे.बेडरूमला तुम्ही हलका गुलाबी, फिकट हिरवा, फिकट निळा, आकाशी किंवा फिकट जांभळा, लव्हेंडर असे रंग देऊ शकता. ह्यात तुम्ही तुमच्या आवडीची रंगसंगती सुद्धा करू शकता.



























































