
दिवाळी म्हटली की एकमेकांच्या घरी जाणे, गप्पा आणि मज्जा मस्ती. त्याला जोड म्हणून एकमेकांच्या घरची जेवणं आणि गोडाधोडाचं खाणं. गेल्या ४ दिवसांपासून पहाटे लवकर उठून अभ्यंग किंवा दिवाळी पहाट सारख्या कार्यक्रमांना लावलेली हजेरी . त्यातच रात्री फटाके उडवणे, पाहुण्यांची ये-जा, आवराआवरी, गप्पा यांमध्ये बराच वेळ जातो आणि झोपायला उशीर होतो. अशातच आवडीचे पदार्थ दणकून खाल्ल्यामुळे एकप्रकारची सुस्ती किंवा आळस अंगात भरतो. यालाच फेस्टीव्हल फटीगही म्हणतात. आता हा आळस घालवून नव्या जोमाने कामाला लागायचं तर काय करायला हवं यासाठीचे काही सोपे उपाय.
१) काहीच काम न करता पूर्ण आराम करा
दिवाळीच्या आधीपासून आपण खरेदी, साफसफाई, फराळाचे पदार्थ अशा खूप गोष्टी करत असतो. त्यातही घरी जेवायला कोणी येणार असेल की घरकाम करुन आपण आणखी थकून जातो. त्यामुळे दिवाळीनंतर एखादा दिवस घरातलं कोणतंच काम न करता पूर्णवेळ फक्त आराम करावा. यामुळे थकवा निघून जाण्यास नक्कीच मदत होईल.
२) छोट्याशा सहलीला जा.
दिवाळीच्या दिवसांत घरात असलो की कामाला पर्यायच नसतो. कितीही ठरवले तरी घरातील लोकांचे आणि आल्या-गेलेल्यांचे सगळे करता करता आपण थकून जातो. ऑफीसला सुट्टी नसेल तर मग आपली तारेवरची कसरत होऊन जाते. अशावेळी किमान अर्धा दिवस किंवा एक दिवस जवळपास कुठे निसर्गाच्या सानिध्यात जाऊन आलो तर आपण मनाने फ्रेश होऊन जातो.
३) शारीरिक हालचाली अत्यावश्यक
फराळाचं किंवा गोडाधोडाचं खाऊन शरीराला एक प्रकारची सुस्ती येण्याची शक्यता असते. आपल्याला बराच काळ झोपून राहावेसे वाटते. मात्र अशातच आपण ठरवून काही किलोमीटर चालावे किंवा ठरवून काही दिवस योगासने, सूर्यनमस्कार, सायकलिंग यासारखा व्यायाम आवर्जून करावा. यामुळे आळस दूर पळून फ्रेश वाटण्यास नक्कीच मदत होते.

























































