डान्स बारवर स्थानिक पोलिसांना छापे टाकण्याचे आदेश, समाजसेवा शाखेचे पंख छाटले

प्रातिनिधिक

मुंबईतील लेडीज बारवर धडक छापेमारी करणाऱ्या गुन्हे शाखेच्या समाजसेवा शाखेचे पंख छाटण्यात आले आहेत. या शाखेने यापुढे डान्स बारवर कारवाई करायची नाही. मानवी तस्करी मोडून काढणे, भिक्षेकरी व बालकामगारांविरोधात धडक कारवाई करण्यावर लक्ष द्या, अशा स्पष्ट सूचना पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी दिल्या आहेत.

गुन्हे शाखेची समाजसेवा शाखा ही मानवी तस्करीविरोधातील कारवाईपेक्षा डान्स बारवरील कारवाईसाठी जास्त चर्चेत असते. मानवी तस्करीविरोधातील कारवाई कमी आणि डान्स बारवरील कारवाईवर अधिकारी जास्त लक्ष द्यायचे. त्यामुळे ही शाखा बदनामीची धनी झाली होती. याची गंभीर दखल पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी घेतली. मानवी तस्करी हा गंभीर विषय असल्याने यापुढे हा प्रकार खपवून न घेण्याचे आयुक्तांनी ठरवले आहे. बालकामगार, भिक्षेकरीमुक्त मुंबई व मानवी तस्करी रोखण्यावर आयुक्तांनी लक्ष दिले आहे. त्यामुळे समाजसेवा शाखेने यापुढे डान्स बारवर कारवाई करायची नाही. आपले मूळ काम मानवी तस्करी रोखण्यावर भर द्यावा, अशा स्पष्ट सूचना आयुक्तांनी दिल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे नियम न पाळणाऱया डान्स बारवर कारवाई करण्याची जबाबदारी आता स्थानिक पोलीस ठाण्यावर असणार आहे. शिवाय वरिष्ठ अधिकारी त्यांच्या अधिकाराखाली विशेष पथक बनवून डान्स बारवर कारवाई करू शकतील, असेही पोलीस सूत्रांकडून समजते.

मोठा झटका….

डान्स बारवर छापे न टाकण्याच्या दिलेल्या सूचना म्हणजे समाजसेवा शाखेला मोठा झटका असल्याचे पोलीस वर्तुळात बोलले जात आहे. डान्स बारवरील कारवायांमुळे ही शाखा बदनाम झाली होती. परिणामी या शाखेवर प्रचंड टीका व्हायची. जोरदार कलेक्शन म्हणून या शाखेकडे बघितले जायचे. पण आता डान्स बारवर कारवाई न करता मानवी तस्करीविरोधात दिलेल्या सूचना या स्वागतार्ह असल्याचे बोलले जात आहे.