Commonwealth Games – पाकिस्तानचे 2 बॉक्सर गायब झाले, बेपत्ता जलतरणपटूचाही अद्याप पत्ता नाही

इंग्लंडमधील बर्मिंघहॅम येथे नुकतील राष्ट्रकुल स्पर्धा पार पडली. स्पर्धा संपल्यानंतर वेगवेगळ्या देशांमध्ये खेळाडूंचे जल्लोषात स्वागत होत असतानाच एक धक्कादायक बातमी आली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सहभागी झालेले पाकिस्तानचे दोन बॉक्सर गायब झाले आहे.

राष्ट्रीय महासंघाने पाकिस्तानचे दोन बॉक्सर गायब झाल्याची माहिती दिली आहे. पाकिस्तानी बॉक्सिंग फेडरेशनचे (पीबीएफ) सचिव नासिर तांग यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सुलेमान बलूच (Suleman Baloch) आणि नजीरुल्लाह खान (Nazeer Ullah Khan) अशी गायब झालेल्या दोन बॉक्सरची नावे असून राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झालेला संघ इस्लामाबादला रवाना होण्यापूर्वी काही तास आधी ते गायब झाले.

नासिर तांग यांनी सांगितले की, सुलेमान बलूच आणि नजीरुल्लाह यांचे पासपोर्ट आणि प्रवासासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झालेल्या संघासोबत गेलेल्या राष्ट्रीय महासंघाच्या अधिकाऱ्यांकडे आहेत. दोन्ही बॉक्सर गायब झाल्याची माहिती ब्रिटनमधील पाकिस्तानी राजदूत आणि लंडनमधील संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. गायब झालेल्या दोन्ही बॉक्सरचा शोध घेण्यासाठी पाकिस्तान ऑलिम्पिक संघाने (पीओए) चार सदस्यांची समिती स्थापन केली आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये पाकिस्तानने दोन सुवर्णपदकांसह 8 पदकांची कमाई केली. वेटलिफ्टिंग आणि भालाफेकमध्ये पाकिस्तानने सुवर्ण कामगिरी केली. मात्र बॉक्सिंगमध्ये पाकिस्तानला एकही पदक जिंकता आले नाही.

जलतरणपटूचाही अद्याप पत्ता नाही

दरम्यान, पाकिस्तानचे खेळाडू गायब होण्याची ही गेल्या दोन महिन्यातील दुसरी घटना आहे. याआधी हंगेरीमध्ये फिना वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी गेलेला पाकिस्तानचा जलतरणपटू फैजान अकबर हा देखील बेपत्ता झाला होता. बुडापेस्टमध्ये पोहोचल्यानंतर पासपोर्ट आणि कागदपत्रांसह तो गायब झाला होता. दोन महिन्यांनंतरही त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही.

श्रीलंकेचे खेळाडूही गायब

बर्मिंगहॅममध्ये श्रीलंकेचे खेळाडूही गायब झाले आहेत. सुरुवातीला ज्युडो खेळाडू चमिला डिलानी आणि तिची मॅनेजर एसेला डीसिल्वा, कुस्तीपटू शनिथ गायब झाले होते. त्यानंतर एकामागोमाग एक सात खेळाडू गायब झाल्याने श्रीलंकेच्या पथकाची चिंता वाढली. हे खेळाडू श्रीलंकेतील आर्थिक परिस्थितीला कंटाळून बर्मिगहॅममध्ये नोकरीच्या उद्देशाने थांबले असावे अशी माहिती श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यांच्याकडे सहा महिन्यांचा व्हिसाही असल्याचे ते म्हणाले.