बेस्टच्या विनाकंडक्टर बस गर्दीच्या मार्गावर धावणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेस्टने ‘वेट लिज’वरील बस सेवेत आणल्यानंतर दोन मार्गावर बुधवारपासून विनाकंडक्टर बससेवा सुरू केली आहे. या बसेस सकाळ आणि संध्याकाळच्या  गर्दीच्या वेळेत धावणार असून प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे. एकूण 45 मार्गांवर कंडक्टरशिवाय बस धावणार आहेत.

बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी पालिकेने अर्थसहाय्य दिल्यानंतर बेस्टमध्ये भाडे करारावर सात हजार बसेस घेण्यात येणार आहेत. त्यापैकी काही मार्गांवर ‘ड्रायव्हर कंपनीचा आणि कंडक्टर बेस्ट’चा अशा सेवा सुरू केल्यानंतर आता विनाकंडक्टर बससेवा सुरू करण्यात आली आहे. या नव्या विनाकंडक्टर असून सुरुवातीच्या थांब्यावर प्रवाशांना तिकिटे विकत घेऊन प्रवेश करावा लागणार आहे. सुरूवातीला कंडक्टर प्रवाशांना तिकीटे देतील परंतू ते बसमध्ये चढणार नाहीत असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

या दोन मार्गांवर सेवा

दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गेटवे ऑफ इंडिया मार्ग क्र.111 आणि इरॉस थिएटर (चर्चगेट) ते फ्री प्रेस जर्नल मार्ग (नरिमन पॉइंट) मार्ग क्र.100 अशा दोन मार्गावर या विनाकंडक्टर बस सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. या बसेस सकाळच्या गर्दीच्या वेळेत चालविण्यात येणार आहेत. महिन्याअखेर कुर्ला ते बीकेसी आणि वांद्रे स्थानकापर्यंत विना कंडक्टर बसेस चालविण्याची योजना आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने ऑगस्ट 2019 मध्ये 75 मार्गांवर विना कंडक्टर बससेवा चालविण्यास अनुमती दिली आहे.