शहर काँग्रेसचे प्राध्यापक संपाविरोधात आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नेवासा

प्राध्यापकांनी 25 सप्टेंबरपासून पुकारलेल्या संपाविरुद्ध ‘चला प्राध्यापकांचा माज उतरवायला’ या शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय सुखधान यांच्या आंदोलनाने नेवासा परिसरात खळबळ उडवली होती. 5 ऑक्टोबर रोजी नेवासा महाविद्यालयाच्या मुलींनी नेवासा तहसील कार्यालयात प्राध्यापकांच्या संपाच्यामुळे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे निवेदन दिले होते. काही विद्यार्थ्यांनीही शहराध्यक्ष संजय सुखधान यांच्याकडे तक्रार केली होती. प्राध्यापक संपावर गेल्याने कंत्राटी शिक्षकांच्या भरवशावर शिक्षण सुरु आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने प्राध्यापकांच्या संपाविरुद्ध सुखधान यांनी आवाज उठवला. संपावरील शिक्षकांना चपलाची माळ घालून त्यांचा माज उतरवण्याचे मेसेज सोशल मिडीयावर सुखधान यांनी फिरवले.

मंगळवारी सकाळी 10 वाजता सुखधान हे कॉलेजमध्ये गेले. त्यांनी संपावरील शिक्षकांशी चर्चा करतानाच सव्वा लाख पगार असताना सातव्या वेतन आयोगाची गरजच काय असा प्रश्न त्यांना विचारला. पोलिसांसारखे तर 24 तास काम नसते. कमी कामामध्ये एवढा पगार असताना सातवा वेतन आयोग स्वीकारण्याऐवजी कंत्राटी काम करणाऱ्या शिक्षकांना आपल्या सातव्या वेतन आयोगातील फरक द्यावा, प्राध्यापक नोकर भरती त्वरित व्हावी, तासिका तत्वावर नेमलेल्या प्राध्यापकांचे मानधन वाढवावे या रास्त मागण्या वरिष्ठांना कळवाव्यात असे विचार मांडले.

या वेळी विद्यार्थीही देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुक्टो संघटनेच्या स्थानिक अध्यक्षांनी सुखधान यांना लिहून दिले की, सुखधान यांनी चर्चेमध्ये सातवा वेतन आयोगाची मागणी अमान्य केली आहे. सदर मागणी करणाऱ्या प्राध्यापकांना सातव्या वेतन आयोगाऐवजी नवीन प्राध्यापकांची भरती करून त्यांना अधिक मानधन द्यावे असे स्थानिक शाखा वरिष्ठांना कळवत असल्याचेही पत्र दिले.