गौतम अदानींना १०५० एकर जमीन प्रतिवर्ष १ रुपये दराने देण्यात आली, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

“बिहार सरकारने भगलपूर जिल्ह्यातील पिरपैंती येथे १०५० एकर जमीन आणि १० लाख झाडे गौतम अदानी यांच्या कंपनीला वीज प्रकल्पासाठी ३३ वर्षांसाठी वर्षाला केवळ १ रुपयाच्या भाड्याने दिली आहेत”, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी केला आहे. बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बिहार दौऱ्यावर आहेत. याआधीच काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी पत्रकार परिषद घेत हा गंभीर आरोप केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा म्हणाले की, “पंतप्रधान मोदी त्यांच्या मित्रासाठी काय काय देत आहेत. बिहारमधील भागलपूरमध्ये, १० लाख झाडे आणि १०५० एकर जमीन गौतम अदानींना ३३ वर्षांसाठी १ रुपये प्रतिवर्ष दराने सुपूर्द करण्यात आली आहे. बिहारमधील वीज प्रकल्पही अदानींना सुपूर्द करण्यात आला आहे.”

ते म्हणाले, “बिहारमध्ये मते चोरण्यासाठी व्यवस्था केली जात आहे. पण जर मतांची चोरी झाली नाही, तर निघण्यापूर्वी ते सर्व काही गौतम अदानींना देत आहेत. हे बिहारमध्ये घडत आहे. पेन्सिलने शेतकऱ्यांच्या जबरदस्तीने स्वाक्षऱ्या घेतल्या गेल्या. त्यानंतर पेनने गोष्टी बदलल्या गेल्या. बिहारच्या लोकांना ६.७५ रुपयांना वीज दिली जात आहे. जमीन त्यांची आहे, कोळसा त्यांचा आहे. तरीही बिहारच्या लोकांना लुटले जात आहे.”

पवन खेरा पुढे म्हणाले की, “महाराष्ट्रातील निवडणुकीपूर्वी, वीज आणि धारावी प्रकल्प गौतम अदानी यांना देण्यात आले. त्याचप्रमाणे झारखंड आणि छत्तीसगडमधील निवडणुकीपूर्वी गौतम अदानी यांना प्रकल्प देण्यात आले होते. ही यादी खूप मोठी आहे आणि जेव्हा भाजपला वाटते की ते निवडणुका हरतील, तेव्हा ते त्याआधी गौतम अदानींना भेटवस्तू देतात.”