मीरा-भाईंदरमध्ये वोटचोरी; काँग्रेसचे पुरावे, भाजपच्या माजी महापौराची तीन मतदार यादीत नावे, आमदार नरेंद्र मेहतांच्या निकटवर्तीयांची नावेदेखील घुसडली

मीरा-भाईंदर व ओवळा-माजिवडा या दोन विधानसभा मतदारसंघात मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला असल्याचा आरोप दीपक बागरी यांनी केला आहे. ते म्हणाले, आमदार नरेंद्र मेहता यांची भावजय डिंपल मेहता यांचे मीरा-भाईंदर मतदारसंघात दोन तर ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात एक अशी तीनदा मतदार यादीत नावे असल्याचे त्यांनी सांगितले. इतकेच नाही तर या याद्यांमध्ये मेहता यांचे निकटवर्तीय व सेव्हल इलेव्हन या बांधकाम कंपनीतील भागीदारांसह हजारो नागरिकांची दुबार नावे असल्याचा आरोपदेखील बागरी यांनी केला आहे. ही दुबार नावे निवडणूक आयोगाला का दिसत नाहीत, असा सवाल देखील काँग्रेसने केला आहे.

मतदार याद्यांमधील घोळावरून महाविकास आघाडीने राज्याच्या निवडणूक आयोगाला घेरले असतानाच काँग्रेसने मीरा भाईंदरमधील वोटचोरीचाही पर्दाफाश केला आहे. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची भावजय आणि मीरा-भाईंदरच्या माजी महापौर डिंपल मेहता यांची चक्क दोन विधानसभा मतदारसंघातील तीन याद्यांमध्ये नावे असल्याचा भंडाफोड काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते दीपक बागरी यांनी डिंपल मेहता व नरेंद्र मेहता यांचे निकटवर्तीय तसेच सेव्हन इलेव्हन बांधकाम कंपनीतील संचालक मंडळांच्या दुबार नावांची यादीच पुराव्यासह आज पत्रकार परिषदेत झळकावली. अशा पद्धतीने मीरा-भाईंदरमधील मतदार याद्यांमध्ये हजारो नावे घुसडून घोटाळा झाल्याचा आरोपदेखील बागरी यांनी यावेळी केला आहे.

डिंपल मेहतांनी केलेल्या मतदानाचा पुरावा दाखवला

डिंपल मेहता ओवळा-माजिवड्यातील प्रभाग क्रमांक १२ मधून नगरसेविका झाल्या होत्या. याच विधानसभा क्षेत्रातील मतदार यादी क्रमांक १२० मध्ये अनुक्रमांक ४१२ वर त्यांचे नाव आहे. २०१७ मध्ये निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये ओळखपत्र क्रमांक एक्ससीई ४०६२९८० याची नोंद केली आहे. असे असताना २० नोव्हेंबर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मीरा-भाईंदर विधानसभा क्षेत्रातील खारिगाव येथील माँ-भारती हायस्कूल शाळेत मतदानाचा हक्क बजावल्याचा व्हिडीओ आणि फोटोचे पुरावेच बागरी यांनी पत्रकार परिषदेत दाखवले. त्यांचे पती विनोद मेहता यांचेही नाव मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघामध्ये नोंदवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

बोगस आधारकार्ड आणि मतदारांची घुसवाघुसवी उघड; रोहित पवारांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे आधारकार्ड काढले, फक्त 20 रुपयांत

फौजदारी गुन्हे दाखल करा

माजी नगरसेवक संजय थेराडे, त्यांची पत्नी वनिता, माजी नगरसेविका कुसूम गुप्ता, त्यांचे पती संतोष, रविकांत उपाध्याय, त्यांची पत्नी शीतल, मेहता यांच्या कंपनीचे संचालक संजय सुर्वे आदींची नावे दुबार आहेत. या प्रकरणाची चौकशी करून या सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.