काँग्रेस-राष्ट्रवादीने मेगा गळतीची चिंता करावी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोला

484

 शरद पवार व अशोक चव्हाण हे भाजपच्या मेगा भरतीवर टिका करतात. मात्र, त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लागलेल्या मेगा गळतीची चिंता करावी, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावच्या सागरपार्क मैदानावर आयोजीत महाजनादेश यात्रेच्या सभेत बोलतांना लगावला. सगळेच प्रश्न सुटले आहेत, सगळ्या समस्या मार्गी लागल्या आहेत, असा माझा दावा नाही. मात्र, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे अनेक प्रश्न युती सरकारने मार्गी लावले आहेत. त्यामुळे प्रश्न व समस्या सुटतील हा लोकांच्या मनात विश्वास असल्याने आम्हाला जनादेश मिळत असल्याचेही फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाराष्ट्रव्यापी महाजनादेश यात्रेला धुळे येथुन सुरुवात झाल्यावर ही यात्रा जळगाव जिल्ह्यात पोहचली. जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा, धरणगाव येथे यात्रेचे स्वागत करण्यात आले. जळगावच्या सागरपार्क मैदानावर आयोजीत जाहीर सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधीत केले. याप्रसंगी जेष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, खासदार उन्मेश पाटील, रक्षा खडसे तसेच आमदार हरीभाऊ जावळे, सुरजितसिंग ठाकुर, स्मिता वाघ, चंदुलाल पटेल, आमदार सुरेश भोळे, माजी आमदार गुरुमुख जगवानी यांच्यासह महापौर, जि.प. अध्यक्षा, नगरसेवक उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या भाषणात म्हणाले की, २००४ ते २०१४ पर्यंत केंद्र व राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते. तेव्हा ईव्हीएम मशीनव्दारेच मतदान झाले. सुप्रिया सुळे या ईव्हीएम मतदानातूनच निवडुण आल्या. ईव्हीएम मशीन मत देत नाही तर मतदानाला जाणारे लोक मत देतात. यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लोकांच्या मनात स्थान निर्माण करावे, असे ते म्हणाले. १९९५ ला युती सरकारने मंजुर केलेले प्रकल्प पुढे पंधरा वर्ष रखडून पडले. आताच्या युती सरकारमध्ये हे प्रकल्प मार्गी लावले जात आहेत. मराठा आरक्षण, ओबीसींसाठी महामंडळ, धनगर समाजाचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम आमच्या सरकारने केल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. उद्योग व गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असुन शिक्षण, आरोग्य अशा सर्वच क्षेत्रात झेप घेतली आहे. देशाला बलशाली करण्यासाठी व महाराष्ट्राला समृध्द करण्यासाठी पुन्हा महाजनादेश द्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

यावेळी जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी आपल्या भाषणात भाजपची महाजनादेश यात्रा निघाल्यावर काँग्रेसच्या नाना पटोलेंनी एक यात्रा काढण्याचे जाहीर केले. त्यांच्यावर पक्षातूनच टिका झाली. तर राष्ट्रवादीही एक यात्रा घेऊन फिरत आहे. मात्र, राष्ट्रवादीची ही महा’जनाजा’ यात्रा असल्याची खिल्ली महाजन यांनी उडविली.

आपली प्रतिक्रिया द्या