
मतदार याद्यांमध्ये अजूनही विसंगती आढळत आहेत. महाराष्ट्रातही अशाच प्रकारची मत चोरी झाली, असं म्हणत काँग्रेसने बिहार एसआयआरवरून निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे. आज बिहारमध्ये काँग्रेसची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत बोलताना बिहार काँग्रेस पक्षाचे नेते शकील खान म्हणाले की, “भाजप सर्व स्वायत्त संस्थांना बिघडवण्यात व्यस्त आहे. काँग्रेसने निवडणूक आयोगासमोर ११ प्रश्न ठेवले आहेत, ज्यांची उत्तरे आम्हाला अजूनही हवी आहेत.”
शकील खान म्हणाले की, “मतदार यादीत अजूनही विसंगती आढळत आहेत. महाराष्ट्रातही अशाच प्रकारची मत चोरी झाली आहे. आम्ही बिहारमधील लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन करतोय. ते (भाजप) बिहारमध्ये मते चोरू इच्छितात. आम्ही निवडणूक आयोगाच्या उत्तराची वाट पाहत आहोत.”
एसआयआरवरून बिहार कांग्रेस अध्यक्ष राजेश राम यांनी निवडणूक आयोगाला मागणी केली आहे की, “एसआयआरमधून स्थलांतर केल्यानंतर ज्या लोकांची नावे वगळण्यात आली त्यांची यादी जाहीर करावी. फॉर्म ६ई द्वारे जोडलेल्या नावांची यादी देखील देण्यात यावी. किती महिलांची नावे वगळण्यात आली आणि किती नवीन यादीत समाविष्ट करण्यात आली, याची यादी देखील जाहीर करावी.”