Lok Sabha 2019 चंद्रपूरचा उमेदवार काँग्रेसने बदलला, अशोक चव्हाणांना शांत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
congress-logo

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

चंद्रपूरमधून विनायक बांगडे यांना काँग्रेसने तिकीट दिल्यामुळे राजीनाम्याच्या तयारीत असलेल्या अशोक चव्हाण यांना शांत करण्यासाठी काँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला आहे. आज काँग्रेसने त्यांची नववी यादी जाहीर केली. त्या यादीत विनायक बांगडे यांच्या ऐवजी सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

चंद्रपूरमध्ये भाजपचे उमेदवार हंसराज अहिर यांच्याविरोधात काँग्रेसने विनायक बांगडे यांना तिकीट दिले होते. त्यामुळे तेथील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला होता. एका कार्यकर्त्याने ही नाराजी दूरध्वनीवरून अशोक चव्हाण यांच्या कानावर घातली त्यावेळी अशोक चव्हाण यांनी माझं इथं कुणी ऐकायला तयार नाही, आपणच राजीनामा द्यायच्या मनस्थितीत असल्याची उद्विग्नता व्यक्त केली होती. त्यांच्या संभाषणाचा ऑड़िओ क्लिप देखील व्हायरल झाली होती. त्यानंतर काँग्रेसने अशोक चव्हाण यांना शांत करण्यासाठी चंद्रपूरची उमेदवारी विनायक बांगडे यांच्याकडून काढून घेत बाळू धानोरकर यांना दिली.

हिंगोलीतून काँग्रेसने सुभाष वानखेडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. हिंगोलीतून राजीव सातव यांचा पत्ता कट केला असून त्यांच्या जागी काही तासांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या सुभाष वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या राजीव सातव यांच्याकडून सुभाष वानखेडे यांचा अवघ्या 1600 मतांनी पराभव झाला होता. या व्यतिरिक्त काँग्रेसने रामटेकमधून किशोर उत्तमराव गजभिये, अकोल्यातून हिदायत पटेल यांना उमेदवारी दिली आहे.