विधानसभेसाठी मुंबई काँग्रेसमध्ये गटबाजी, उमेदवार निवडीसाठी चार जणांची समिती

538
congress

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्याने काँग्रेसच्या दिग्गजांनी विधानसभा निवडणुकीतून काढता पाय घेतला आहे. त्यातच मुंबई काँग्रेसमधील गटातटाच्या राजकारणामुळे उमेदवार कसा निवडायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर्गत गटबाजी अधिक उफाळून येऊ नये यासाठी उमेदवार निवडीसाठी एक समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असून प्रत्येक मतदारसंघातून तीन नावे दिल्लीला पाठविण्यात येणार आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची प्रक्रिया काँग्रेसने सुरू केली आहे. काँग्रेसच्या माजी आमदारांनी पाठ फिरवली असून आपल्या मुलांसाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. त्यातच मुंबई काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मिलिंद देवरा आणि माजी अध्यक्ष संजय निरुपम यांच्या समर्थकांमध्ये असलेली स्पर्धा लक्षात घेता मुंबईत काही जागांवर बंडखोरी होण्याची शक्यता आहे.

माजी मंत्री मैदानातून बाहेर
मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष व माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे. कलिना विधानसभा मतदारसंघातून मुलगा नरेंद्र मोहन याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न चालविले आहेत. वांद्रे पश्चिम येथील माजी आमदार बाबा सिद्धिकी यांचा मुलगा झिसीन सिद्धिकी यांनी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. माजी मंत्री सुरेश शेट्टी हेदेखील निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याचे समजते.

जोगेश्वरी, गोरेगाव, दिंडोशीत रस्सीखेच
जोगेश्वरीत काँग्रेसची फारशी ताकद नसली तरी सहा ते सात जणांनी उमेदवारीसाठी पक्षाकडे अर्ज सादर केले आहेत. दिंडोशीत साधारण तशीच परिस्थिती असून वर्सोव्यामध्ये सर्वाधिक 14 जणांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी दावा केला आहे. अंधेरी पश्चिममधून माजी आमदार अशोकभाऊ जाधव पुन्हा प्रयत्न करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या